आमदारांचे मौखिक आदेश; वरूड येथील पाणीपुरवठ्याची कामे बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 03:48 PM2023-11-11T15:48:25+5:302023-11-11T15:48:35+5:30
नागरिकांचा ठिय्या : पाण्यासाठी उद्रेक; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याचे लेखी पत्र
अमरावती : जलजीवन मिशन अंतर्गत वरूड तालुक्यातील पंढरी ३५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे ही आमदार देवेंद्र भुयार यांच्या मौखिक आदेशानेच बंद करण्यात आल्याचे लेखी पत्र शुक्रवारी दस्तुरखुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
शुक्रवारी वरुड ३५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात तब्बल चार तास वरुड तालुकावासीयांनी येथील जीवन प्राधिकरण प्रादेशिक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वरुड तालुक्यातील ३५ गावातील पाणीपुरवठ्याकरिता जलजीवन मिशन अंतर्गत पंढरी ३५ गावे पाणीपुरवठा योजना मंजूर असून, या कामाची किंमत १०० कोटी एवढी आहे. यामध्ये ४१.७२ कोटींची कामे खासगी कंपनीला दिली आहेत. ६० कोटींतून जलवाहिनीचा पुरवठा शासनाकडून होणार आहे. या योजनेतील कामे कंत्राटदाराने सुरुवात केली आणि शासनाने जलवाहिनीचा पुरवठा केला. या योजनेचे १०० कोटीपैकी ५० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र या योजनेची कंत्राटदाराने अचानक कामे बंद केली आहेत. या अर्धवट कामांमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत.
अनेकदा ग्रामस्थांनी कंत्राटदारास काम का बंद आहे, याबाबत विचारणा केली असता मजीप्राचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता यांनी काम बंद केले असे सांगण्यात आले, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. या योजनेचे कामे ५० टक्के पूर्ण झाले आणि आता ही कामे बंद करण्यात आल्याने वरुड तालुक्यातील ३५ गावांचे नागरिक संभ्रमात पडले आहेत. ही योजना लवकर पूर्णत्वास जावी, यासाठी अभियंत्यांना जाब विचारण्यासाठी वरुडवासीयांनी शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले.
लोकप्रतिनिधीमुळे ३५ गावचे नागरिक पाण्याविना
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय परतणार नाही, अशी भूमिका वरूड येथील त्रस्त नागरिकांनी घेतली. काही काळ मजीप्रा कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण होते. लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. मात्र कामे बंद का झालीत, याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी दिलेले लेखी पत्र धक्कादायक ठरणारे आहे.
आठ दिवसात पंढरी ३५ गावे बाधित ३५ गावांतील नागरिकांसोबत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. मजीप्राच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा इशारा देण्यात आला आहे.
- विक्रम ठाकरे, माजी सभापती, वरूड