शेतातील मचाण लुप्त होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:13 AM2021-09-18T04:13:38+5:302021-09-18T04:13:38+5:30
आपल्या शेताचे रक्षण जंगली प्राण्यांपासून व्हावे तसेच स्वतःचेही रक्षण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ‘मचाण’ झोपडी बांधत ...
आपल्या शेताचे रक्षण जंगली प्राण्यांपासून व्हावे तसेच स्वतःचेही रक्षण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ‘मचाण’ झोपडी बांधत होता. आज आधुनिक युगात शेतकऱ्याने ही आपली वाटचाल बदलल्यामुळे आता मचाण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमालाच्या रक्षणासाठी शेतात मचाण बांधत असे. साधारणत: शेताच्या मध्यभागी उंचावर ती बांधण्यात येत होती. पिकाचे जंगली प्राण्यांपासून रक्षण व्हावे व स्वतःचेही रक्षण व्हावे, हा मचाण उंचावर बांधण्यामागचा हेतू असायचा. परंतु, कालांतराने अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतीला जोडधंदा म्हणून अनेक योजना मिळत गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एखादी शेड बांधून कुक्कुटपालन, पशुपालन सुरु केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. ज्या शेतकऱ्यांची बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घराची निर्मिती केल्याचेही दिसून येते.
आता या मचाणकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसते आहे. पंधरा-वीस वर्ष अगोदर शेतकरी आपल्या शेतामध्ये ज्वारी हे मुख्य पीक म्हणून पेरणी करत होता. परंतु, जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी, मूग लावणे बंद केले. त्यामुळे शेतामध्ये उंचावर मचाण बांधण्यातसुद्धा कालांतराने खंड पडत गेला, असे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.
पूर्वी शेताचे रक्षण करण्यासाठी मोठे जमीनदार आपल्या शेतामध्ये रखवालदार ठेवत असत. आता मात्र कोणीही शेतकरी रखवालदार ठेवत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला कोणत्याही प्रकारचे कुंपण नसल्याने रखवालदार ठेवणे गरजेचे होते, आता मात्र अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे, काटेरी अथवा विद्युत कुंपण योजनेंतर्गत झाल्याने रखवालदाराची गरजसुद्धा पडत नसल्याचे सांगितले जात आहे.
विज्ञानवादी युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने शेतकरी तरी कसा मागे राहणार, त्यामुळे जुन्या रुढीला फाटा देत अशा मचाणांची संख्या लुप्त झाली आहे. भविष्यात येणाऱ्या पिढीला मचाणचे चित्र फक्त पुस्तकांमधूनच बघायला नक्की मिळणार...
170921\img-20210815-wa0502.jpg
फोटो