पोलिसांकडून विवाह संस्थांचे ‘व्हेरिफिकेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:02 AM2017-12-06T00:02:56+5:302017-12-06T00:05:28+5:30
प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांडानंतर शहरातील विवाह मंडळांची माहिती काढण्याचे निर्देश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सर्व ठाण्यांना दिले होते.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांडानंतर शहरातील विवाह मंडळांची माहिती काढण्याचे निर्देश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सर्व ठाण्यांना दिले होते. त्यानुसार अमरावती शहरात तीन विवाह मंडळे असल्याचे निदर्शनास आले असून विवाह लावणाऱ्या या संस्थांना पोलीस विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील.
सोशल मीडिया, चित्रपट, रंगारंग कार्यक्रम, टीव्ही सिरीयल आदी माध्यमांतून आजचा तरुणवर्ग प्रेम प्रकरणाकडे वळत आहे. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे प्रमाण अधिकच वाढले असून मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढसुद्धा झाली आहे. नुकतीच प्रेमप्रकरणातील एक मोठी घटना प्रकाशित झाली आहे. प्रियकराने प्रेयसीसोबत विवाह मंडळात लग्न केले. मात्र, या लग्नास मुलीच्या आई-वडिलांनी विरोध दर्शविला. त्यानंतर प्रियकराने मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजीच आहे. प्रतीक्षा मेहेत्रे असे प्रेमप्रकरणाला बळी पडलेल्या मुलीचे नाव आहे. प्रेमानंतर विवाह मंडळात जाऊन प्रतीक्षा व राहुलने लग्न केले होते. त्यांच्याप्रमाणेच शहरातील अनेक मुले-मुली कुटुंबीयांना न सांगता विवाह मंडळात जाऊन लग्न करतात. रीतीरिवाजानुसार साक्षीदार व पंचांसमक्षहा हा विवाह केला जातो. हा विवाह होतो. मात्र, तरीसुद्धा समाज या विवाह ग्राह्य धरेलच असे नाही. विवाह संस्था सुरू करणारे कायदेशीर परवानगी घेतात. त्यानुसार मुला-मुलींचे लग्न लावून देतात. मात्र, शहरात असणारे हे विवाह संस्था अधिकृत आहेत किंवा नाहीत, याची शहानिशा करण्यासाठी पोलीस विभागाने आता पाऊल उचलले आहे. शहरात किती विवाह संस्था आहे, याची माहिती सीपींनी मागविली. त्यानुसार शहरात तीन विवाह संस्था असल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरात विवाह लावणाऱ्या किती संस्था आहेत, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. त्यांची विवाह लावण्याची प्रक्रिया कशी चालते, त्याचे काम कायदेशीर चालते काय, या सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. त्यांच्या कार्यपद्धती पडताळून पाहण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात येईल.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.