अमरावतीतून एक हजारांवर वकिलांच्या सनदेची पडताळणी, वकील संघामार्फत पाठवले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 05:50 PM2017-11-07T17:50:08+5:302017-11-07T17:50:24+5:30
अमरावती : वकिलांच्या सनदेच्या पडताळणीला मुदतवाढ मिळाल्यानंतर अमरावती जिल्हा वकील संघाच्या पुढाकाराने १०८० वकिलांनी यासाठी अर्ज केले आहेत.
अमरावती : वकिलांच्या सनदेच्या पडताळणीला मुदतवाढ मिळाल्यानंतर अमरावती जिल्हा वकील संघाच्या पुढाकाराने १०८० वकिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १५६३ वकिलांपैकी उर्वरित १० टक्के वकिलांची सनद धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
न्यायालयात कार्यरत बोगस वकिलांना आळा बसावा, यासाठी सुप्रीम कोर्टाने बार कौन्सिल आॅफ इंडियाला वकिलांची सनद पडताळणीचे आदेश दिले होते. बार कौन्सिल आॅफ इंडियाने दिलेली मुदत संपल्यानंतर राज्यातील ५० हजारांपेक्षा अधिक वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्ज न केल्याची बाब समोर आली होती. मात्र, मुदतवाढीनंतर विविध शहरांतील वकील संघांनी सनद पडताळणीसाठी अर्ज पाठविल्यामुळे हे संकट टळले आहे.
अमरावती जिल्हा वकील संघाने शिबिराच्या माध्यमातून वकिलांकडून अर्ज भरून घेतले. त्यापूर्वी नोटीस व मोबाइल संदेशद्वारे वकिलांना सूचना देऊन सनद पडताळणीबाबत सजग केले. न्यायालयात सराव करणा-या सर्व वकिलांचे अर्ज पाठविण्यात आले आहेत. ९० टक्के वकिलांचे अर्ज वकील संघातर्फे पाठविण्यात आले असून, दहा टक्के वकिलांमध्ये काही हयात नाहीत, तर काही जणांनी सराव सोडल्याचा निर्दशनास आले आहे. सद्यस्थितीत उर्वरित वकिलांच्या सनद पडताळणीसाठी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाने मुदतवाढीची मागणी केली असून, त्यासाठी सुप्रीम कोर्टात याचीका दाखल केली आहे. बार कौन्सिल आॅफ इंडियाकडून मिळालेल्या निर्देशानुसार जिल्हा वकील संघातर्फे सनद पडताळणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
प्रशांत देशपांडे,
अध्यक्ष, अमरावती जिल्हा वकील संघ