वरुड येथील वैध मापन निरीक्षक बनाफर निलंबित
By admin | Published: April 1, 2015 12:19 AM2015-04-01T00:19:39+5:302015-04-01T00:19:39+5:30
तालुक्यातील दुकानदारांकडून पठाणी वसुली करणारा वैध मापन निरीक्षक विजय बनाफर याला अकोला विभागाचे उपनियंत्रक ललीत हारोडे यांच्या पथकाने ...
वरूड : तालुक्यातील दुकानदारांकडून पठाणी वसुली करणारा वैध मापन निरीक्षक विजय बनाफर याला अकोला विभागाचे उपनियंत्रक ललीत हारोडे यांच्या पथकाने निलंबित केल्याने वरुडच्या व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मोर्शी उपविभागाचे वैध मापनशास्त्र विभागाचे अधिकारी विजय पतेसिंह बनाफर यांनी शहरातील दुकानदारांना अनेकवेळा धमकावून आणि कायद्याची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याची चर्चा होती. २४ मार्चला दुपारी शहरात येवून वसुली करीत असताना दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडाला आणि या अधिकाऱ्याला पांढुर्णा चौक परिसरात चोप देवून पोलिसांच्या हवाली केले होते. व्यापारी संघाच्या वतीने पोलीस ठाण्यात वरुड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक वानखडे, माजी अध्यक्ष जगदीश उपाध्याय, गिरीधर देशमुख, विनय चौधरी, अंशूमन मानकर , बालू राउत, मोन्टी राजपूत, जितू शहा, संदीप तरार, आनंद खेरडे, लोकेश अग्रवाल यासह अनेक दुकानदारांनी तक्रार करुन सदर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होेती. व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून या घटनेचा निषेध केला होता.
यावेळी पोलीसांनी या अधिकाऱ्याच्या कारचा पंचनामा केला असता काही वस्तू आणि रक्कमसुध्दा आढळून आली होती. वरुड ठाणेदार अर्जून ठोसरे यांनी वैध मापन शास्त्र विभाग अकोलाचे उपनियंत्रक ललित हारोडे यांचेकडे हा अहवाल पाठविला होता. त्यानुसार अकोला येथून विशेष पथक वरुडला दाखल झाले. चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. त्या अहवालानुसार वरीष्ठांनी विजय पतेसिंह बनाफर याला निलंबित केले. चौकशी सुरु केली आहे.
बनाफर यांची चौैकशी करण्यासाठी औैरंगाबाद येथील वैैधमापन विभागाचे अधिकारी शालीचवार यांची नियुक्त करण्यात आले आहे. (तालुका प्रतिधीनी)