पहिल्याच दिवशी बहिरमला भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 11:06 AM2020-11-18T11:06:11+5:302020-11-18T11:07:20+5:30
Bahiram Amravati News मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी श्री सिद्धक्षेत्र बहिरमला बहिरमबुवांच्या दर्शनाकरिता भक्तांची एकच गर्दी उसळली होती. भक्तांच्या मांदियाळीत सकाळपासून सायंकाळपर्यंत भक्तांची सतत वर्दळ राहिली.
अनिल कडू
अमरावती : मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी श्री सिद्धक्षेत्र बहिरमला बहिरमबुवांच्या दर्शनाकरिता भक्तांची एकच गर्दी उसळली होती. भक्तांच्या मांदियाळीत सकाळपासून सायंकाळपर्यंत भक्तांची सतत वर्दळ राहिली.
लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने बहिरम मंदिराकडे येणारे रस्ते सात महिन्यांपासून बंद होते. भक्तांना मंदिरात प्रवेश नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सोमवारी पहिल्यांदा हे मंदिर भक्तांकरिता खुले केले गेले. मंदिरावर येणारे रस्ते मोकळे केले गेलेत. यात अनेक भक्त आपल्या चारचाकी, दुचाकी वाहनाने, तर वाहन नसलेले पायी बहिरमबुवाच्या दर्शनाला दाखल झालेत. यात वेगळाच उत्साह आणि भाव भक्तांमध्ये बघायला मिळाला.
दरम्यान, बहिरमबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापक सुनील ठाकरे, सहव्यवस्थापक सचिंद्र ऊर्फ पिंटू ठाकरे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या. मास्कशिवाय दर्शन नाही, फिजिकल डिस्टिन्सिंग पाळण्यासह गर्दी टाळण्याचे निर्देश व्यवस्थापकांनी दर्शनार्थींना दिलेत. मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण केले गेले. दर्शनार्थींच्या हातावर सॅनिटायझर दिले गेले. दुरून दर्शन घेण्याची अनुमती भक्तांना दिली गेली. गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आला.
मंदिर परिसरात रेलिंगच्या बाहेर एका टेबलवर बहिरमबुवाची एक छोटी मूर्ती, नारळ फोडण्याची मशीन ठेवली गेली. बहिरमबुवाला अर्पण करण्याकरिता आणलेा गेलेला शेंदूर, तेल, लोणी ठेवण्याकरिता स्वतंत्र व्यवस्थाही केली गेली. काही भक्तांनी घरून आणलेल्या शिदोरीरूपी डब्यातून सहभोजनाचा मंदिर परिसरातील नैसर्गिक वातावरणात आनंदही लुटला. मंदिरावर भक्तांना त्रासदायक ठरलेल्या लालतोंड्या माकडांचीही यात चांगलीच चंगळ राहिली.
शासन, प्रशासनाच्या निर्देशानंतर बहिरमबाबाचे मंदिर सोमवारपासून भक्तांकरिता खुले केले गेले. मंदिरावर येणारे रस्ते मोकळे करण्यात आले. आवश्यक ती खबरदारी घेत भक्तांना दर्शनास अनुमती आहे. गर्भगृहात भक्तांना प्रवेश नाही. मास्कसह फिजिकल डिस्टिन्सिंग पाळणे भक्तांकरिता बंधनकारक आहे.
- सुनील ठाकरे, व्यवस्थापक,
बहिरमबाबा मंदिर, बहिरम.