पशुवैद्यक : ग्राम विकासाचा वारसदार
By admin | Published: April 25, 2015 12:22 AM2015-04-25T00:22:17+5:302015-04-25T00:22:17+5:30
आज जागतिक पशुवैद्यक दिन. या दिनाच्या निमित्ताने ग्राम विकासात भरीव योगदान देणाऱ्या पशुवैद्यकांचे कौतुक करणे क्रमपात्र आहे.
पशुधनाविना शेतीउद्योग अधुरा : पशुसंधर्नात पशुचिकित्सकांचे योगदान मोलाचे
आज जागतिक पशुवैद्यक दिन. या दिनाच्या निमित्ताने ग्राम विकासात भरीव योगदान देणाऱ्या पशुवैद्यकांचे कौतुक करणे क्रमपात्र आहे. अत्यंत गरीब व समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत ग्रामीण क्षेत्रात पोहोचणारा पशुवैद्यक त्यांच्यासाठी विकासातील महत्त्वाचा घटक आहे.
२५ एप्रिल २०१५ हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक पशुवैद्यक दिवस (हङ्म१’ िश्ी३ी१्रल्लं१८ ऊं८) म्हणून साजरा केला जात आहे. जगात मुक्या प्राणी व पक्ष्यांची सेवा करणाऱ्या पशुवैद्यकांची व दिलेल्या योगदानाची आठवण ठेवण्यासाठी या दिवसाचे प्रयोजन आहे. सन २००० पासून डॉ. जिन एडवर्ड व पाम यांच्या सहकार्याने व वर्ल्ड व्हेटर्नरी असोशिएशनच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो. प्राचीन काळात माणसांबरोबरच प्राणी व पक्षी यांना होणारे आजार, विकार व त्यापासून त्यांची मुक्तता करणे हे काम पशुवैद्याने केले आहे.
ज्याप्रमाणे पहिला माणूस हा स्वत:चा स्वत:च डॉक्टर होता, त्याचप्रमाणे पशुवैद्यकही होता. ह्या तत्त्वाच्या आधारे प्राण्यांचे व पक्ष्यांचे निरीक्षण करून माहिती गोळा केली गेली. वेगवेगळ्या वनस्पती औषधींची ओळख व माहिती उपलब्ध झाली आणि ही माहिती आयुर्वेद म्हणून अस्तित्वात येऊन प्राणी, पक्षी व मनुष्याच्या उपयोगी पडली.
सामान्य भारतीय माणसाला पूर्वीपासूनच पशुधनाचे महत्त्व ज्ञात होते. पशुधनाशिवाय शेती उद्योग अधुरा आहे, याची त्याला पूर्णत: जाणीव होती. रोजीरोटी उपलब्ध करण्यासाठी उत्पन्न देणाऱ्या प्राणीमात्रांची तो निगा राखू लागला. त्याच्या रोजच्या आहारात अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून दूध वापरू लागला. तसेच शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणाऱ्या पशुधनावर अवलंबून असल्याची खात्री पटल्यानंतर त्याचे संवर्धन करणे हळूहळू महत्त्वाचे वाटायला लागले. तेव्हापासून पशुधन जोपासना व आरोग्य जपण्याचा प्रयत्न शासकीय स्तरावर खऱ्या अर्थाने सुरू झाला.
पूर्वकाळापासून परंपरागत पद्धतीने चाललेला दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन आजही तसाच आहे, त्यात फारशा प्रमाणात नवीन तंत्रज्ञान दिसून येत नाही. १० ते ५० लिटरपर्यंत दूध निर्मिती करणाऱ्या उत्पादकांची संख्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अशा सामान्य शेतकऱ्याला प्रगत व महागड्या पद्धतीने व्यवस्थापन करणे परवडण्यासारखे नक्कीच नाही. दूध उत्पादन करताना त्याची नियमितता खंडित होते व तोट्याच्या नावाखाली तो शेतकरी धंदा बंद करतो. नव्याने दुग्ध व्यवसायात आलेल्या शेतकऱ्यांचे व्यवसायात टिकण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. दूध उत्पादक हा दूध विक्रेता किंवा उद्योजक कधीच होऊ शकला नाही. उद्याच्या पिढीने सकारात्मक विचार समोर ठेवून दूध उत्पादक व उद्योजक बनण्याचे धाडस ठेवले पाहिजे; तरच सामान्यांच्या कष्टाचे चीज होईल. संवर्धन म्हणजे जोपासना करणे, जपणे, निगा राखणे, आरोग्य अबाधित ठेवणे, नष्ट होण्यापासून बचाव करणे अशा आशयाने संवर्धन केल्यास नामशेष होण्याची वेळ कदापी येणार नाही. मात्र भारतातील जातीवंत पशुधनाच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. अधिकाधिक दूध उत्पादन निर्मितीच्या स्पर्धेत संकरीकरणाच्या माध्यमातून विदेशी जातींचा वापर सुरू झाला. दूध उत्पादनात अव्वल नंबर भारताला मिळाला. हे जरी गौरवास्पद असले तरी तेवढ्याच गतीने देशी जातीवंत गोधनाची मूळ ओळख अस्पष्ट व्हायला सुरुवात झाली. विदेशी जातीच्या संकरीकरणाचा अप्रत्यक्षरीत्या परिमाण देशीपासून गावठी/नॉन डिस्क्रीप्ट पशुधन निर्माण झाले. अश्या काही जाती निर्माण झाल्या आहेत की त्यांची वर्गवारी करणे कठीण झाले आहे. भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी धोरणात्मक बदल करणे शासनाला आवश्यक झाले आहे.
दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला तेथून पुढील काळात हक्काची लढाई लढण्यास तयार रहावे लागणार आहे. अमृततुल्य दूध घराघरात पोहचविण्याचं काम शेतकरी करतो. सकाळची सुरुवात चहाच्या निमित्ताने दुधापासून होते. संपूर्ण अन्नाचा दर्जा मिळालेलं दूध आजपर्यंत प्रयोगशाळेत निर्माण करता आले नाही. ते गोमातेच्या रक्तातूनच तयार होते. असे असताना दुग्ध व्यवसायाची प्रक्रिया व विकासदर कुठे वाढलेला आहे तर काही प्रमाणात भ्रामक आहे. कष्ट करायचे दूध उत्पादकाने मात्र लाभ मिळवायचा अन्य लोकांनी हे चित्र जास्त दिवस पाहायचे नसेल तर एकत्रित लढा उभारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. २० ते तिशीतील पदवीधर व सुशिक्षित तरुणांनी अशा उद्योग व्यवसायाकडे वळायला पाहिजे. त्यांचे भवितव्य चांगले असणार आहे. शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकास गंगोत्रीच्या माध्यमातून प्रथम प्राधान्य मिळायला हवे. या उद्योगाला विकासाच्या दिशेने यांत्रिकीकरणासारखे महत्त्व, पैसा व अनुदान पुरविणे शासनाच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. आत्मसन्मान व श्रमाचे दाम शेतकऱ्यांच्या पदरी पाडण्याकरिता प्रत्यक्ष लोकसहभाग व सामूहिक इच्छाशक्ती पणाला लावणे नितांत गरजेचे आहे. पशुसंवर्धनाच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या आर्थिक वृद्धीचा दर प्रतिवर्षी वर सरकत राहावा, असे वित्त संस्थेला वाटते. कारण ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी व तत्सम उद्योग विकासांवर विसंबून आहे यात दुमत नसावे. स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकविणे अपरिहार्य आहे. व्यवसाय न बदलविता तो वेगवेगळ्या पद्धतीने करून गरूड झेप घेण्याची वेळ आली आहे. करिता शासन, विद्यापिठ, शास्त्रज्ञ व पशुवैद्यक ह्यात मोलाची कामगिरी बजावणार आहेत. दूध उत्पादक व पशुपालक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक म्हणून पाहण्याची संधी निश्चितच लाभणार आहे. मागील दशकापासून महाराष्ट्रातील पशुपालक आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्याचे दिसून येत आहे. कमकुवत आर्थिक बाजू शेतकऱ्यांचे मनोबल खच्चीकरणास कारणीभूत ठरत आहे. अशा बिकट स्थितीतून सरळ जीवन संपविण्याचा मार्ग शेतकरी पत्करतो. त्याची जीवन जगण्याची इच्छाशक्ती संपुष्टात येते. आर्थिक विषमता या गोष्टीला मारक ठरली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांचे आत्मसन्मान व मनोधैर्य वाढविण्याचे प्रयत्न पूरक ठरणार आहेत. अशा प्रकारची सुरुवात होणे गरजेचे आहे व भविष्यात व्यापक स्वरुप अपेक्षित आहे.
जसजसा काळ बदलत गेला तसतसे बरेच बदल अन्य क्षेत्रांमध्ये झाले. काळाच्या गरजेनुसार पशुवैद्यक शास्त्र या विषयातील उपविषय व संकल्पना वाढल्या. आज या क्षेत्रात तयार होणारा पशुवैद्यक बँकेपासून सैन्य दलापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत आहे. कृषिप्रधान देशाचा कणा असलेली शेती व त्याला साथ देणारे पशू व पक्षीपालन यांचे महत्त्व किंवा स्थान कमी होणार नाही, हे खरे म्हणूनच या दिनाचे औचित्य साधून सर्व पशुवैद्यकांनी ग्रामविकासात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे. शासनाने नेमून दिलेल्या कामाच्या तासांचे रुपांतर मनोबल खचलेल्या गरीब, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी झाल्यास ग्रामविकासाचा वारसदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे निश्चित.
- डॉ. विजय शा. राहाटे
सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, अचलपूर.
जनावरांची वंशावळी जतन व्हावी
जातीवंत पशुधनांची वंशावळी जतन करून कृत्रिम रेतनात त्यांचा तातडीने उपयोग करणे पोषक ठरणार आहे. अधिक उत्पादनासोबत वातावरणाशी समरस होणारी आनुवंशिकता शोधून शेतकऱ्यांच्या दारात पोहचविण्याची जबाबदारी आज पशुचिकित्सकांवर आली आहे. पशुचिकित्सक ही कामगिरी सहज पार पाडतील यात शंका नाही.
पशुसंवर्धनात पुरुषांप्रमाणे महिलांचा सहभाग महत्त्वाचा
पशुसंवर्धनामध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करताना पुरुषांप्रमाणे महिलांचाही सहभाग ह्यानंतरच्या काळात असणे आवश्यक झाले आहे. आज मुक्त अर्थव्यवस्थेच्या युगात दुधाच्या प्रतिकडे गांभार्याने लक्ष पुरविणे नितांत गरजेचे आहे. दुधाची गुणवत्ता ही फट व डिग्रीवर ठरविली जात आहे. परंतु डब्लू. टी. ओ. च्या अंमलबजावणीनंतर दुधात बिनरोगकारक जंतुची संख्या एक मिली दुधामागे तीस हजारापेक्षा जास्त नको व प्रतिजैविक औषधांचा अंश नको. भारतासारख्या विकसनशील देशातील डेअरी उद्योगात संख्यात्मक प्रगती झाली असली तरी गुणात्मक प्रगतीकरिता झटावे लागणार आहे आणि म्हणूनच महिलांच्या अंगीकृत असलेली काटकसर, एकाग्रता, संगोपन, स्वच्छता, व्यवस्थापन व कुटुंबाप्रती एकनिष्ठता ह्या गुणांमुळे भविष्यातील आव्हाणे स्वीकारणे सोयीचे होईल. आजपर्यंत महिला वर्गाचा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायात अप्रत्यक्षरीत्या सहभाग होता. हा सहभाग प्रत्यक्षरीत्या मिळविणे पूरक व्यवसायांकरिता हितावह ठरणार आहे.
जनावरांच्या वेदना ओळखण्याची असावी लागते खुबी
भारतातील उत्पादनक्षम पशुधनाचे संवर्धन करण्यात पशुपालक हा खरा उतरलेला आहे. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्राणिमात्रांवर अपार प्रेम करुन त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. पशुपालकांच्या बरोबरीने, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालये, पशुचिकित्सा शास्त्रज्ञ व पशुचिकित्सक यांचे योगदान पशुसंवर्धनामध्ये तेवढेच महत्त्वाचे ठरते. पशुपालक व पशुचिकित्सक हे संवर्धनातील महत्त्वाच्या दोन बाजू आहेत. ‘पशुवैद्यकीय चिकित्सक हे जगातील सर्वोत्तम रुग्ण निदान तज्ज्ञ आहेत, असे माझे मत आहे. त्यांचे रुग्ण आपले दु:ख काय ते सांगू शकत नाहीत. पशुचिकित्सकाला ते स्वत:च जाणून घ्यावे लागते. विल रॉजर यांच्या या विधानाने पशुसंवर्धनाच्या विकासात पशुचिकित्सकाला सिंहाचा वाटा मिळतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.