प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्हायल संपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:12 AM2021-04-18T04:12:52+5:302021-04-18T04:12:52+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण आटोपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोनो प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू करण्यात आली. सुरुवातीला लसीचा साठा पुरेसा असल्याने शहरासोबतच ग्रामीण भागात लसीकरणाने गती घेतली होती. अशातच लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यात आले होते. त्यानंतर साधारणत: १२ एप्रिल रोजी जिल्ह्यात २० हजार लसींच्या डोसचा पुरवठा शासनाकडून करण्यात आला होता. यातील १४ हजार लस १४ तालुक्याला प्रत्येकी १ हजाराप्रमाणे पुरवठा करण्यात आला होता. मात्र, आता हा लसीचा साठाही संपला आहे. परिणामी जिल्हाभरात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सुरू केलेली लसीकरणाची मोहीम गत दोन दोन दिवसांपासून लसीचा साठा संपल्यामुळे जिल्हाभरात ८० पेक्षा जास्त केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे आता नवीन लसीचा स्टॉक येईपर्यंत तरी ही लसीकरणाची केंद्र सुरू होणे अशक्य असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
नागरिक जात आहेत परत
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा संपल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा प्रथम व द्वितीय डोस घेणाऱ्या नागरिकांची लसीकरण केंद्राकडे गर्दी होत असताना लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना आल्यापावली घराकडे परत जावे लागत आहे.
कोट
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी १४ तालुक्याला १४ हजार लसीचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानुसार पीएचसीसह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, आता लसीचा स्टॉक नसल्यामुळे लसीकरणाची केंद्र तूर्तास बंद आहेत.
- डॉ.दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी