परतवाड्यात ‘लॉकडाऊन’चा बळी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:18+5:30

अनिल कडू। लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : शहरातील एका आॅटोरिक्षाचालकाचा १५ मे रोजी मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या काळात बुडालेला रोजगार, ...

Victim of lockdown in return? | परतवाड्यात ‘लॉकडाऊन’चा बळी ?

परतवाड्यात ‘लॉकडाऊन’चा बळी ?

googlenewsNext
ठळक मुद्देरोजगार, धान्याची विवंचना : पत्नीकडे, मित्रांजवळ केल्या होत्या भावना व्यक्त

अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातील एका आॅटोरिक्षाचालकाचा १५ मे रोजी मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या काळात बुडालेला रोजगार, आर्थिक विवंचना आणि कुटुंबाची चिंता या बाबींनी ब्रेन हॅमरेज होऊन त्यांचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, सामाजिक स्तरावर हा टाळेबंदीचा बळी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राजेश माहोरे (४७, रा. गोपालनगर) असे मृताचे नाव आहे.
राजेश माहोरे हे निर्व्यसनी होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. हातमजूरीशीवाय दुसरा पर्याय नाही. मुलगा, मुलगी व पत्नी आणि धाकटा भाऊ एवढे छोटे कुटुंब. यात पत्नी दोन चार घरी जाऊन स्वयंपाक करते. मुलगा किराणा दुकानात मिळेल ते काम स्वीकारतो. लहान भाऊ खेडोपाडी जाऊन मोबाईलचे सिमकार्ड विकतो. पण, कोरोना लॉकडाऊनमुळे ते सर्व थांबले. गाठीशी असलेल्या पैशांतून राजेशने कुटुंबाचा गाडा हाकला. स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आरसी नंबर नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराने धान्य दिले नाही. आता लॉकडाऊन उठले नाही, तर काही खरे नाही, मरणाशिवाय पर्याय नाही, अशी खंतही राजेश माहोरे यांनी आपल्या सवंगड्यांकडे मृत्यूपूर्वी अनेकदा व्यक्त केली.
धान्यासाठी त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. याच मानसिक ताणतणावात आणि कुटुंबाच्या विवंचनेत ते खचले. १४ मे रोजी त्याची प्रकृती बिघडली. शेजारच्या मंडळींनी त्यांना परतवाडा येथील खाजगी रुग्णालयात आणि त्याच दिवशी सायंकाळी अमरावती येथे जिल्हा सामान्य रू ग्णालयात दाखल केले. तेथे बे्रन हॅमरेजचे निदान झाले. मात्र, १५ मे रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच दिवशी परतवाड्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. शेजारी, मित्रमंडळींनी वर्गणी गोळा केली. त्यांच्या घरी जीवनावश्यक वस्तूंसह किराणा पुरविला. मात्र, आता हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

लॉकडाऊनमुळे रोजगाराअभावी ते आर्थिक विवंचनेत होते. तणावाखाली होते. सतत कुटुंबाची काळजी करायचे. विचारात राहायचे. अचानक तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान ते गेले. लॉकडाऊन नसता, तर असे घडले नसते.
- पिंगळा माहोरे
मृताची पत्नी

लॉकडाऊनमध्ये आॅटोरिक्षा बंद आहेत. यात राजेश माहोरेंचा रोजगार बुडाला. आर्थिक संकटाचा सामना करीत ते गतप्राण झाले.
- विजू उखळकर, आॅटोचालक मित्र, ब्राम्हणसभा, परतवाडा

आॅटोरिक्षा बंद. रोजगार गेला. रेशन दुकानदाराने आरसी नंबर नाही म्हणून शिव्या देत हाकलले. धान्य दिले नाही. धान्याकरिता तो माझ्याजवळ रडला. काही खरे नाही, आता मरायची वेळ आली आहे, असेही तो बोलला होता.
- राजेश गवळी, मित्र, परतवाडा

घटना दु:खद आहे. धान्य न देणाऱ्या दुकानदाराविरुद्ध निश्चित कारवाई करण्यात येईल. मृताच्या कुटुंबीयांना मदत केली जाईल.
- मदन जाधव, तहसीलदार.

मृत रुग्णाविषयी सध्या काही सांगता येणार नाही. बुधवारी उपजिल्हा रुग्णालयातील दस्तावेज बघून माहिती देता येईल.
- डॉ. सरवत वर्मा, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर.

Web Title: Victim of lockdown in return?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.