जलयुक्त शिवारातील बोगस कामाने घेतला बालकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:13 PM2018-10-01T22:13:15+5:302018-10-01T22:13:53+5:30
गावालगतच्या नाल्यात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा जलयुक्त शिवार योजनेतील बोगस कामाने बळी गेल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे रविवारी रात्री घडली. तळेगाव दशासर पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचल्यामुळे मृतदेह रात्री ११ पर्यंत पाण्यातच होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : गावालगतच्या नाल्यात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा जलयुक्त शिवार योजनेतील बोगस कामाने बळी गेल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे रविवारी रात्री घडली. तळेगाव दशासर पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचल्यामुळे मृतदेह रात्री ११ पर्यंत पाण्यातच होता.
पार्थ अशोक धानोरकर (१३, रा. सातेफळ) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. सातेफळ गावाजवळील नाल्यात तो पोहायला गेला होता. मात्र, सिमेंट प्लगच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात खुले ठेवलेल्या लोखंडी बारचा त्याला मार लागला आणि खड्ड्यातच बुडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सायंकाळी अशोक धानोरकर यांना स्मारकाजवळील बंधाऱ्याच्या काठावर पार्थचे कपडे आढळून आले. तेथेच शोध घेतला असता तेव्हा त्याचा मृतदेह रात्री ८ वाजता नाल्यातील खड्ड्यात मिळाला. शेतकरी कुटुंबातील पार्थच्या पश्चात आई-वडील व १० वर्षाचा भाऊ आहे. सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. बंधाºयाचे कंत्राटदार कुटे (यवतमाळ) व अभियंता कडू यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
पोलिसांचा बेजबाबदारपणा
ग्रामस्थांनी रविवारी रात्री सव्वाआठला माहिती दिल्यानंतरही तळेगाव दशासर पोलीस १०.३० नंतरही घटनास्थळी पोहोचले नव्हते. आपचे नितीन गवळी यांनी एसडीपीओंशी संपर्क केल्यावर रात्री ११ वाजता पोलीस दाखल झाले.
फाळेगाव फाटा येथे अपघातात एकाचा मृत्यू
तालुक्यातील सातेफळ येथील सेवा सहकारी सोसायटीचे सचिव मनोज ज्ञानदेव दुधाट (३४) या युवकाचा बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव फाटा येथे अपघातात मृत्यू झाला. ते सातेफळ येथून यवतमाळ येथे मित्राकडे दुचाकीने गेले होते. रात्री परत येताना फाळेगाव फाटा येथे रस्ताच्या बाजूला उभ्या हार्वेस्टरला मागून रात्री १ वाजता दुचाकीची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ३ वाजता सातेफळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा आहे.