कडाक्याच्या थंडीने घेतला वृद्धाचा बळी
By admin | Published: January 10, 2015 12:02 AM2015-01-10T00:02:03+5:302015-01-10T00:02:03+5:30
काही दिवसांपासून शहरात थंडीचा कहर वाढला आहे. कडाक्याच्या थंडीने गारठून एका अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला. शहरातील मोर्शी मार्गावरील शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरील फुटपाथवर ही घटना घडली.
अमरावती : काही दिवसांपासून शहरात थंडीचा कहर वाढला आहे. कडाक्याच्या थंडीने गारठून एका अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला. शहरातील मोर्शी मार्गावरील शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरील फुटपाथवर ही घटना घडली.
गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. सद्यस्थितीत अनोळखी वृध्दाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. थंडीने गारठून मरण पावलेला हा वृध्द निराश्रित असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर रोज रात्री झोपत होता. गुरूवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून पारा घटला आहे. थंडीमुळे शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. शाळकरी विद्यार्थीदेखील यामुळे हैराण झाले आहेत. उड्डाणपूल, मंदिरांचे ओटे, फुटपाथवर राहणाऱ्या निराधार निराश्रितांचे या थंडीमुळे प्रचंड हाल होत आहेत. पुरेशा ऊबदार कपड्यांअभावी तसेच अंथरूण, पांघरूणाअभावी त्यांना कुडकुडत रात्र काढावी लागते.
तरूण मंडळी या थंडीचा सामना कसेबसे करीत असले तरी वृध्दांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. पुरेशा रोगप्रतिकारक शक्तीअभावी थंडीमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गारठ्याचा सामना करण्यास सक्षम नसलेल्या निराधार वृध्दाला थंडीमुळे जीव गमवावा लागला.