‘व्हिक्टर’च्या नाईट राऊंडमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:06 AM2017-08-30T00:06:56+5:302017-08-30T00:07:16+5:30
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर वचक राहण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक रस्त्यावर उतरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर वचक राहण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक रस्त्यावर उतरले आहेत. सलग दोन दिवसांपासून पोलीस आयुक्तांनी शहरात रात्रकालीन राऊन्ड लावल्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी रात्री सीपींनी रहाटगाव मार्गावरील रिच गार्डनवर धाड टाकून संचालकसह मद्य प्राशन करणाºया १० जणांना अटक केली.
विलासनगर स्थित आशीर्वाद, आदर्श व चियर्स बारची पोलिसांनी तपासणी करून वॉन्टेड चार आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान बारसमोर उभ्या असलेल्या विनाक्रमाकांच्या १० दुचाकी जप्त केल्या. त्याच मार्गावरील सर्व हॉटेल व बारवर लक्ष केंद्रित करीत सीपींनी रहाटगाव रिंगरोडकडे मोर्चा वळवला. तेथील रिच गार्डन हॉटेलची तपासणी केली असता मद्य प्राशन करणारे १० ग्राहक आढळले. हॉटेलमध्ये गोपनीय खोली असल्याचे दिसून आले.
खोल्याची तपासणी करण्यात आल्यावर त्या ठिकाणी अश्लील कृत्यासंदर्भातील आपत्तीजन्य साहित्य पोलिसांना आढळून आले.
नांदगाव पेठ पोलिसांनी संचालकासह १० जणांना तेथून अटक केली. परत येताना महामार्गावर काही तरुण सिगारेट ओढताना आढळले. ते गांजाची सिगारेट ओढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधत्माक कारवाई केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीपींनी उचललेले पाऊल अवैध व्यावसायिकांच्या मुळावर घाला घालणारे असून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कर्तव्यदक्ष अधिकाºयांचा पुरावाच आहे. पोलीस आयुक्तांनी अवैध धंदे रोखण्यासाठी उचलेले पाऊल हे सामान्य नागरिकांसाठी आशादायी ठरले आहे.
बिअरबार चालविणाºया ‘त्या’ पोलिसावर कारवाई
रहाटगाव मार्गावरील साई संतोष ढाबा चालविणारा शेखर बिरे हा ग्रामीण भागातील पोलीस कर्मचारी पदावर कार्यरत असून त्याची पत्नी नगरसेविका असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी नांदगाव पेठ पोलिसांना दिले आहे. तसेच त्या पोलिसाचा 'डिफॉल्टी' अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्याचे नांदगाव पेठ पोलिसांना सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत तो पोलीस कर्मचारी पसार झाला आहे.