विदर्भात येत्या चार दिवसात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:11 PM2020-04-11T18:11:15+5:302020-04-11T18:12:34+5:30
कोरोना विषाणूचे संकट गडद होत असताना, वातावरणातही बदल होत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अंबानगरीत विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. पुढील १५ एप्रिलपर्यंत विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूचे संकट गडद होत असताना, वातावरणातही बदल होत आहे. ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा अंबानगरीत विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. पुढील १५ एप्रिलपर्यंत विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली.
अमरावती, यवतमाळ , चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात १२ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी पाऊस कोसळेल. १३ एप्रिलला पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली येथे पावसाची शक्यता आहे. १४ एप्रिल रोजी बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. १५ एप्रिल रोजी पूर्व विदर्भात व यवतमाळ येथे तुरळक पावसाची शक्यता आहे. दरम्यान कमाल तापमान ४० अंश सेलसिअसच्या आसपास राहणार आहे. ढगाळ वातावरण वरच्या वर येत असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बंसमुळे १८ एप्रिलपर्यंत कमी-जास्त प्रमाणात कायम राहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे.
मध्य पाकिस्तान आणि राजस्थानवर चक्राकार वारे
मध्य पाकिस्तान आणि राज्यस्थानवर ९०० मीटरच्या उंचीवर चक्राकार वारे आहेत. कर्नाटक किनारपट्टी , मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ या पट्ट्यामध्ये कमी दाबाची द्रोणिका किंवा खंडित वाऱ्याची स्थिती आहे. त्याच्या परिणामी विदर्भात पावसाची शक्यता आहे.