विठुरायाच्या गजरात रंगली ‘विदर्भ पंढरी’
By admin | Published: November 27, 2015 12:17 AM2015-11-27T00:17:51+5:302015-11-27T00:17:51+5:30
‘पुंडलिक वरदे.... हरी विठ्ठल.... श्री ज्ञानदेव तुकाराम, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल’ या भक्तीरसाने ओथंबलेल्या ...
कौंडण्यपूर गजबजले : ‘रुक्माई-वल्लभा’च्या दर्शनाचा अद्वितीय सोहळा
तिवसा : ‘पुंडलिक वरदे.... हरी विठ्ठल.... श्री ज्ञानदेव तुकाराम, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल’ या भक्तीरसाने ओथंबलेल्या जयघोष आणि रुक्माई वल्लभाच्या भेटीची अनिवार ओढ यामुळे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्तांनी चालविलेल्या विठ्ठल नामगजराने श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे गुरुवारी प्रति पंढरपूर अवतरल्याचा भास होत होता.
प्राचीन विदर्भाची राजधानी असणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर नगरीत १९ नोव्हेंबरपासून कार्तिक पोर्णिमा यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. मात्र, गुरुवारी दहिहंडी सोहळ्याच्या निमित्ताने हजारों भाविकांची उपस्थिती होती. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे दीड दिवस अधिवासाचे वचन प्रत्यक्ष पांडूरंगांनी प्राणप्रिय सदाराम महाराजांना दिले होते. या पवित्र मातीमध्ये पुराणातील पाच महासतींनी जन्म घेतला. येथील मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरणे केले. या प्राचीन नगरीला गतकाळातील वैभवशाली परंपरा लाभली आहे. प्राचीन भारतवर्षातील गौरवशाली परंपरा लाभलेल्या अनेक धार्मिक अमरावती जिल्ह्यातील वशिष्ठा (वर्धा) नदीकाठी असणारे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर हे अग्रणी आहे.
५९ पालख्यांची परिक्रमा
तिवसा : गुरुवारी सकाळी कौंडण्यपूरला आलेल्या ५९ पालख्यांनी नगरात परिक्रमा केली. यावेळी चौकाचौकात दिंडी व पालख्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष हिंमतराव टाकोने, उपाध्यक्ष वसंतराव डाहे, सचिव नामदेवराव अमाळकर, कोषाध्यक्ष अरविंद वेरुळकर, सहसचिव सदानंद साधू, सदस्य रंगराव महाराज टापरे, वासुदेवराव दोड, श्रीधर देशमुख, वां.बां. बांबल, गजानन बुल, सत्यनारायण चांडक, हरीश मुंधडा, अशोक पवार, शुभांगी काळे, अतुल ठाकरे आदि उपस्थित होते. दुपारी संत अच्युत महराज सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुधीर दिवे परिवारांचे वतीने उपस्थित सर्व भाविक पालख्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
दुपारी राजराजेश्वर महाराज कमलापीठ यांच्या मार्गदर्शन झाले.त्यानंतर अंजनगांव सुर्जी देवनाथ मठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज यांनी संत अच्युत महाराज लिखित ग्रंथाचे प्रकाशन केले.
दहीहांडी सोहळ्याचे प्रवचन हभप ज्ञानेश्वर महाराज गुल्हाने यांनी केले. सायंकाळी ६ वाजता टेकडीवर दहीहांडी सोहळा पार पडला. यावेळी हजारों भाविक भक्त उपस्थित होते.