विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढला, कॉरिडोरअभावी वन्यपशूंची नागरी वस्त्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 04:20 PM2017-10-02T16:20:34+5:302017-10-02T16:21:14+5:30

जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॉरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणा-या वन्यपशूंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Vidarbha tigers-human struggle increases; wild animals run wild animals without any corridor | विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढला, कॉरिडोरअभावी वन्यपशूंची नागरी वस्त्यांकडे धाव

विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढला, कॉरिडोरअभावी वन्यपशूंची नागरी वस्त्यांकडे धाव

Next

अमरावती : जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॉरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणा-या वन्यपशूंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाघाने माणसांवर केलेल्या हल्ल्यांच्या ९० टक्के घटना जंगलात, तर १० टक्के जंगल आणि गावांच्या सीमेवर झाल्या आहेत.

वाघांच्या अधिवासात मानवी समूहाकडून होणा-या अतिक्रमणामुळे त्यांचे अधिवास असुरक्षित झाले आहेत. यंदा पाऊस कमी पडला. जंगलातील नदी-नाल्यांना अपुरे पाणी असल्याने वन्यपशू पाण्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये धाव घेत असल्याचे चित्र आहे. जंगलालगतची गावे जंगलावर अवलंबून असल्यामुळे वाघ जंगलाबाहेर पडतात आणि जंगलालगतच्या गावांत प्रवेश करतात. त्याठिकाणी वाघ-मानव संघर्ष उद्भवतो. 

अधिकांश घटनांमध्ये वयात येणा-या वाघानेच हल्ले केले आहेत. हल्ल्यानंतर हा वाघ मृतदेह खातसुद्धा नाही. हे प्रमाण फार कमी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जंगलाशेजारच्या रहिवाशांसाठी वनविभागाकडून विविध योजना, उपक्रम राबविले जातात. मात्र, या योजनांचा लाभ आदिवासींसह अन्य समूहांना मिळत नसल्याची ओरड आहे. नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात सोमवार २ आॅक्टोबर २०१७ रोजी वरूड तालुक्यातील शहापूर शेतशिवारात गंगोत्री हिरालाल नवडे (६५) या महिलेचा मृत्यू झाला. तसेच वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या आदिवासीबहुल पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव या तिन्ही गावांत नरभक्षक वाघिणीच्या भीतीने दस-याला सोने देण्याची ४० वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) तालुक्यातील गोगाव येथे रविवार १ आॅक्टोबर २०१७ रोजी शेतावरून परतणा-या नामदेव नन्नावरे नामक शेतक-यावर वाघाने हल्ला चढविला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागील काही महिन्यांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्षात वाढ झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. ही बाब वनविभागासाठी अतिशय चिंतनीय असून ब-याच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वर्षी १०२ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू
सन २०१६ मध्ये १०२ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात ४७ वाघ, ३२ वाघीण आणि २३ प्रकरणांत वाघ होता की वाघीण, हे कळलेच नाही. यातील ३५ मृत्यू अनैसर्गिक, ४३ नैसर्गिक आणि २४ प्रकरणांत मृत्युची  कारणेच कळली नाहीत. सन २०१५च्या तुलनेत सन २०१६ मध्ये वाघांच्या मृत्यूची टक्केवारी देशात १४५ च्या वर वाढल्याचे ‘क्लॉ’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

वाघांच्या मृत्यूची टक्केवारी
जानेवारी ते मार्च २०१६- २८.४३ टक्के
एप्रिल ते जून २०१६- २९.४१ टक्के
जून ते सप्टेंबर २०१६- २१ टक्के
आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६- २१.५६ टक्के

वाघांचे वय आणि मृत्यूची टक्केवारी
एक ते तीन वर्षे- २७.४५ टक्के
चार ते नऊ वर्षे- ३०.३९ टक्के
दहा वर्षांवरील- १९.६ टक्के
वयांची माहिती नाही- २२.५४ टक्के

Web Title: Vidarbha tigers-human struggle increases; wild animals run wild animals without any corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.