‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:15 PM2018-04-20T22:15:27+5:302018-04-20T22:15:27+5:30
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड तालुक्यातील संत्राउत्पादकांना तीव्र उन्हामुळे फळगळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय संत्राझाडांना देण्यासाठी पाणी मिळवितानाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड तालुक्यातील संत्राउत्पादकांना तीव्र उन्हामुळे फळगळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय संत्राझाडांना देण्यासाठी पाणी मिळवितानाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत.
जिल्ह्यातून संत्र्याचे सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टर क्ष्ोत्र वरूड तालुक्यात आहे. संत्र्याच्या आंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटायला सुरुवात झाली, तर बोअर बंद पडले. नऊ सिंचन प्रकल्पामध्ये केवळ २० ते ३० टक्केच जलसाठा आहे.
अतिशय तापमान आणि खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्रा वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.
आवक असलेल्या ठिकाणावरून पाणी घेऊन रात्रीबेरात्री ओलीत करून संत्रा जिवंत ठेवावा लागत आहे. तापमान वाढल्याने तसेच कोळी रोगाने आंबिया बहराला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
आंबिया बहराला गळती !
तालुक्यात संत्राउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असून, कोट्यवधी रुपयांची संत्री या परिसरातून विकली जातात. गेल्या काही वर्षापासून निसर्ग कोपला असल्याने आंबिया बहराला दृष्ट लागली आहे.
मार्च, एप्रिल महिन्यातच अतितापमानामुळे मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने शेतकºयांच्या हाती येणारे संत्र्याचे नगदी पीक बुडाले आहे. संत्रा उत्पादकांवर दरवर्षी अस्मानी संकट उभे ठाकत आहे.
अतिशय तापमानाचा फटका बसत असल्याने ५० टक्क्यांवर आंबिया बहराला गळती लागली आहे. कोट्यवधीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने सर्वेक्षण करून शासनाकडे तसा अहवाल द्यावा.
- उद्धव फुटाणे, संत्राउत्पादक, तिवसाघाट