विदर्भाचे नंदनवन चिखलदरा सध्या @ ४०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:24 AM2018-05-12T11:24:06+5:302018-05-12T11:24:15+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा या पर्यटनस्थळाच्या तापमानात देखील प्रचंड वाढ झाल्याने या थंड हवेच्या ठिकाणाकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा या पर्यटनस्थळाच्या तापमानात देखील प्रचंड वाढ झाल्याने या थंड हवेच्या ठिकाणाकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत येथे ३९ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथे झाली. रस्ते सुनसान पडले आहेत. जंगलात सतत आगडोंब उसळत असल्यानेही तापमानात वाढ होत आहे
कधीकाळी येथे उन्हाळ्यात हजारो पर्यटकांची गर्दी राहायचीे. विश्रामगृह किंवा हॉटेलचे आरक्षण मिळणेही कठीण जायचे. दोन महिने आधी चौकशी केली जायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने स्थानिकांनाच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पर्यटकांनाही भीषण पाणीटंचाई व आता प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. चिखलदऱ्याला मागील काही वर्षात अवकळा आल्याने आता नावालाच पर्यटनस्थळ उरले का, असा सवाल पर्यटक निराश मनाने परत जाताना करीत आहेत. येथील नगरपालिकेच्या पर्यटक कर वसुली नाक्यावरसुद्धा अल्प पर्यटकांची नोंद आहे. नागपूर येथील एका कुटुंबाने येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी विवाह समारंभ ठेवला होता. त्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींनीसुद्धा चिखलदऱ्याबद्दल ऐकले, त्याच्या विपरित स्थिती असल्याचे मत मांडले.
गतवर्षी ४२ अंशाची नोंद, तापमानात सतत महिनाभर वाढ
समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर असलेल्या या पर्यटनस्थळावर दरवर्षी तापमानात वाढ होत असल्याचे वास्तव आहे. येथील सिपना महाविद्यालयाच्या तापमान केंद्रावर पूर्ण मे महिन्यात ३७ ते ३९ अंश सेल्सिअस कमाल तर २४ ते २७ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. गुगलवर ३९ ते ४० अंश तापमानाची नोंद दाखवित आहे. गतवर्षी सर्वाधिक ४२ अंश तापमानाची नोंद येथील तापमान केंद्रावर झाली आहे.
चिखलदरा येथील तापमान दरवर्षी ३९ ते ४० अंश अंश सेल्सीअसपर्यंत राहते. गतवर्षी ४२ अंश सेल्सीअसची नोंद झाली होती. देशभर हवामानात होत असलेल्या बदलाचा फटका चिखलदरासुद्धा बसला आहे.
- प्रा. विजय मंगळे, पर्यावरणशास्त्र विभाग, सिपना महाविद्यालय चिखलदरा