विदर्भाचे नंदनवन हरवले धुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:39 PM2019-06-30T22:39:07+5:302019-06-30T22:39:32+5:30
विदर्भातील एकमेव थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरा येथे अखेर एक महिन्यानंतर धुके पसरले आणि पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार सुटीचा दिवस पाहता पर्यटकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
चिखलदरा : विदर्भातील एकमेव थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरा येथे अखेर एक महिन्यानंतर धुके पसरले आणि पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार सुटीचा दिवस पाहता पर्यटकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
मान्सूनने यावर्षी तब्बल एक महिना उशिरा हजेरी लावल्याचा फटका राज्यभरातील सर्व पर्यटनस्थळांसह चिखलदऱ्यालाही बसला. मेळघाटात दरवर्षी ७ जूनपूर्वीच मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र चांगलीच दांडी मारली. अखेर उशिरा का होईना, मागील चार दिवसांपासून मेळघाटात कुठे मुसळधार तर कुठे पावसाची रिपरीप सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटकांची पावले चिखलदरा पर्यटनस्थळांकडे आपसुक वळतात. पांढरे शुभ्र दाट धुके कोसळणाºया मुसळधार पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक घेतात. पावसाने संततधार लावल्यास येथील उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि नदी-नाले खळखळून वाहायला सुरुवात होणार आहे.
तीन हजारांवर पर्यटकांची हजेरी
उन्हाळ्यात चिखलदरा शहरात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पर्यटकांनीही या स्थळाकडे पाठ फिरविली होती. शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस पाहता तीन हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. त्यातूनच चिखलदारा नगरपालिकेला पर्यटक कर रुपाने १५ हजार रुपये प्राप्त झाले. येत्या काही दिवसांत या पर्यटन स्थळावर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
दिवसा लागलेत वाहनांचे दिवे
चार दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर पांढºया शुभ्र दाट धुक्याची चादर आंथरली आहे. त्यामुळे दुचाकी आणि मोठ्या वाहनधारकांना दिवसा वाहनांचे दिवे सुरू करून प्रवास करावा लागत आहे.