विदर्भाच्या नंदनवनात पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:05 PM2019-03-11T23:05:43+5:302019-03-11T23:06:32+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीची पाणीटंचाई पाहता, पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे दुर्दैवी चित्र आहे. स्थानिकांमध्ये पाणीटंचाई व पाणीकपातीबाबत संताप व्यक्त होत आहे.
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीची पाणीटंचाई पाहता, पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे दुर्दैवी चित्र आहे. स्थानिकांमध्ये पाणीटंचाई व पाणीकपातीबाबत संताप व्यक्त होत आहे.
सिडकोच्या स्थापनेनंतर चिखलदऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा कांगावा केला जातो. मात्र, पेयजलाची समस्या चिखलदरावावीयांच्या पाचवीला पुजली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो आराखडे आखण्यात आले. मात्र, ते कागदावरच राहिले. चिखलदरा शहर विकास प्राधिकरण अंतर्गत तयार करण्यात आलेल्या बागलिंगा प्रकल्पानेही वणवण थांबलेली नाही. स्थानिकांमध्ये नागरिकांमध्ये दिवसा आड होणाºया पाणीपुरवठयाबाबत संताप व्यक्त होत आहे. पाण्याअभावी पर्यटकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतला चिखलदऱ्याचा बेत रद्द केला आहे.
घोषणांचाच पाऊस
विदर्भाच्या नंदनवनावर कोसळणाऱ्या पावसावर परतवाडा, अचलपूरनजीकची चंद्रभागा, सापन, शहानूर आदी प्रकल्पासह इतर लहान-मोठे तलाव अवलंबून आहेत. प्रत्यक्षात दरवर्षी उन्हाळा येताच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. तरीसुद्धा स्थानिक प्रशासनासह कोणीच गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. चिखलदºयात दरवर्षी घोषणांचा पाऊस होतो. त्या खरोखरीच घोषणा ठरतात.
आठशे ग्राहक अन् तलाव कोरडे
चिखलदरा शहराला जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. चिखलदऱ्यात केवळ ८६९ ग्राहक असून, त्यांच्यासाठी दररोज सहा लक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील शक्कर तलाव व कालापाणी तलावात मोजकाच जलसाठा उपलब्ध असून, तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी १९९३ मध्ये पूर्णत्वास नेलेल्या शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील पाणीपुरवठा योजनेतूनच चिखलदरा शहराची तहान भागविली जात आहे.