Video: विसर्जनावेळी उंचावरुन फेकली बाप्पांची मूर्ती, नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 09:35 AM2022-09-11T09:35:44+5:302022-09-11T14:48:26+5:30
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत त्यांना हिंदुत्त्वाचे दाखले दिले जात आहेत.
अमरावती/मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या काहि महिन्यांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यामुळे, त्यांच्या प्रत्येक कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सोशल मीडियावरही त्याची चर्चा होत असते. ४ दिवसांपूर्वी त्यांनी अमरावतीमधील एका पोलीस ठाण्यात पोलिसांना आक्रमक आणि सडेतोड भाषेत सुनावले होते. अमरावतीत एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर हे वातावरण चांगलच तापलं होतं. या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यासह हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे, सध्या नवनीत राणा मीडियाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यातच, आता त्यांनी केलेल्या गणपती विसर्जनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनीही हा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टिका केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा म्हणण्यावरुन राज्यात राजकीय गदारोळ घातलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कधी हिंदुत्त्व, कधी हनुमान चालिसा, कधी लव्ह जिहाद या प्रकरणांवरुन त्यांनी भूमिका घेत सरकारला आणि प्रशासनाला धारेवर धरले होते. यात त्यांना तुरुंगातही जावे लागले. त्यामुळे, नवनीत राणा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यातच, दोन दिवसांपूर्वी झालेल्या गणपती विसर्जनातही त्यांनी बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. या दरम्यान, बाप्पांची मूर्ती विसर्जन करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत त्यांना हिंदुत्त्वाचे दाखले दिले जात आहेत.
ठेकेदारों का गणेश विसर्जन की नई परंपरा!! pic.twitter.com/FFa1VqilZa
— Atul Londhe (@atullondhe) September 10, 2022
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही ट्विटवरुन हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. ठेकेदारांच्या गणेश विसर्जनाची नवीन परंपरा... असे कॅप्शन देत लोंढे यांनी राणा दाम्पत्यांना लक्ष्य केलं आहे.
राणांचा संताप, पण लव्ह जिहादप्रकरणात वेगळच सत्य
अमरावतीच्या पोलीस ठाण्यात खासदार राणा आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. तेथे कॉल रेकॉर्डिंगवरून त्यांची पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी तू तू मै मै झाली. घरातून बेपत्ता झालेली मुलगी लव्ह जिहाद प्रकरणात अडकली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी बाचाबाची करत जोरदार राडा घातला होता. संबंधित मुलगी सापडली असून ती घरगुती कारणातून एकटीच घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर पोलीस पत्नी वर्षा भोईर यांनी नवनीत राणा यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांचा एकेरी उल्लेखही केला.