तरुणीचे टक्कल करून व्हिडीओ केला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 07:08 PM2018-05-23T19:08:07+5:302018-05-23T19:08:07+5:30
एका १९ वर्षीय तरुणीचे टक्कल करुन व्हिडीओ काढून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नांदगावपेठ हद्दीतील धोतरा गावालगतच्या जंगलात घडला.
अमरावती - एका १९ वर्षीय तरुणीचे टक्कल करुन व्हिडीओ काढून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नांदगावपेठ हद्दीतील धोतरा गावालगतच्या जंगलात घडला. या गंभीर कृत्याची तक्रार पीडितेने पोलीस आयुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी नांदगावपेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
तक्रारीनुसार, आई-वडील नसलेली ही १९ वर्षीय तरुणी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बु. येथे दोन लहान भावांसोबत राहते. तिच्याच नातेवाइकांपैकी अनिल भोसले, करणसिंग पवार, राहुल भोसले व राजा वाघाडे असे चौघे मंगळवारी तिच्या घरी आले. त्यांनी तरुणीला जबरीने उचलून दुचाकीवर बसविले आणि धोतरा गावालगतच्या जंगलात नेले. तेथे हातपाय बांधून ब्लेडच्या साहाय्याने केस काढून तिचे टक्कल केले. त्या चौघांपैकी एकाने मोबाईलवर चित्रीकरण केले. तो व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याचे पीडितेने म्हटले आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास किंवा पोलीस तक्रार केल्यास जिवे मारून टाकण्याची धमकीही दिली. त्यामुळे तिने या घटनेची वाच्यता कोणाजवळ केली नाही तसेच पोलीस तक्रारही केली नाही.
भीम आर्मीचा पुढाकार
भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना हा गंभीर प्रकार माहिती होताच त्यांनी पीडित मुलीला धीर देत तिच्या मनातील भीती काढली. बुधवारी दुपारी भीम आर्मीचे महासचिव मनीष साठे, शहरप्रमुख बंटी रामटेके, अॅड. सुधीर तायडे, संजय भवते, साची फाऊंडेशनचे अध्यक्ष जगदीश गोवर्धन, विजय शेळके, विजय बादशे यांनी तिला घेऊन डीसीपींकडे तक्रार केली.
केस कापण्याचे कारण गुलदस्त्यात
मुलीचे केस का कापण्यात आले, याचे कारण गुलदस्त्यातच आहे. ती मुलगी ज्या समाजाची आहे, त्याच समाजातील नागरिकांनीच त्या मुलीचे केस कापले. ती मुलगी लहान भावांसोबत घरी एकटीच राहत होती. तिच्या चारित्र्यावर संशय घेणाºयांनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घडलेला प्रकार गंभीर असून, हे कृत्य करणाºयांना सोडले जाणार नाही. पीडितेच्या तक्रारीनुसार चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नांदगाव पेठ पोलिसांना दिले आहे.
चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त.