Video : वर्धा नदीतील दुर्घटनेपूर्वीचा व्हिडिओ समोर आला, धबधब्याखाली घेतला होता आडोसा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 08:08 AM2021-09-16T08:08:21+5:302021-09-16T08:33:25+5:30
गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते. विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे.
अमरावती - जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. नावाड्यासह तिघांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले. त्यात दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. इतरांचा शोध सुरु आहे. या घटनेपूर्वीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामध्ये, पाण्याच्या प्रवाहात नाव एका जागी थांबल्याचे दिसून येत आहे.
गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते. विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे. त्यामुळे मटरे कुटुंबातील १२ जणांना नौकानयनाचा मोह झाला. सकाळी दहाच्या सुमारास नाव महादेव मंदिराकडे जात असताना उलटली. नावेत १३ जण होते. त्यात अतुल वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे (२०), अदिती खंडाते (१०), मोना खंडाते (१२), आशु खंडाते (२१, सर्व रा. वर्धा), निशा मटरे (२२), पियुष मटरे (८, दोघे रा. गाडेगाव), पुनम शिवणकर (२६) यांचा समावेश आहे. नाविक नारायण मटरे (४५), किरण खंडारे (२८), वंशिका शिवणकर (२) यांचे मृतदेह सापडले. अद्यापही इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील नाव दुर्घटनेपूर्वीचा व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/lf6L6Uu2BE
— Lokmat (@MiLOKMAT) September 16, 2021
या व्हिडिओत नदीपात्रात पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह दिसत असून धबधब्यातूनही मोठ्या गतीने पाणी वाहत आहे. या धबधब्याच्या पायध्याला एक आडोसा घेऊन नाव थांबविण्यात आल्याची दिसून येत. याच प्रवाहात नावेतील प्रवाशांची संख्या अधिक असल्याने व पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने नावेचे संतुलन राखणे शक्य झाले नसल्याचे दिसून येते.
बेकायदेशीर जलपर्यटनाचे बळी
नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीतील झुंज धबधब्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. येथे मच्छीमारांच्या होड्यांमध्ये नदीत फेरफटका मारणे याचे पर्यटकांना आकर्षण असते. अनेकदा नाविक होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना बसवतात. जलसफारी करताना जीवरक्षक साधनांचा वापर होत नाही. जल सफारी घडवणाऱ्या या होड्या पूर्णतः बेकायदेशीर आहेत. त्यांना मच्छीमारी किंवा पर्यटन असा कोणताही परवाना नाही. हे ११ जण याच बेकायदेशीर जलपर्यटनाला बळी पडले.
अडथळ्यांतही बचावकार्य सुरू
मुसळधार पावसातही प्रशासनामार्फत बचाव व शोधकार्य सुरू असून नावेतील सर्वांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता आहे. अमरावतीवरुन जिल्हा शोध व बचाव पथकाच्या २० जणांची चमू दाखल झाली असून शोधकार्य सुरु आहे. तसेच नागपूर येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच राज्य आपत्ती निवारण दलाची चमूही दाखल झाली आहे.