पदवीधर निवडणूक : मविआचे लिंगाडे यांची विजयाकडे घौडदौड, भाजपचे रणजित पाटील पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:28 AM2023-02-03T05:28:29+5:302023-02-03T05:30:01+5:30
Vidhan Parishad Election: पदवीधर मतदारसंघासाठी चुरशीच्या लढतीत महाआघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची ४३४५३ मते मिळाली असून त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्यावर २४२६ मतांची आघाडी घेतली आहे.
अमरावती : पदवीधर मतदारसंघासाठी चुरशीच्या लढतीत महाआघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची ४३४५३ मते मिळाली असून त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्यावर २४२६ मतांची आघाडी घेतली आहे. आहे. पाटील यांना पहिल्या पसंतीची ४१,११९ मते मिळाली, विजयी मतांचा ४७, ०३४ कोटा कुणीच पूर्ण केला नसल्याने आता बाद उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात येत आहेत. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांच्या माेजणीनंतर ८७३५ अवैध ठरली होती. यामध्ये भाजपचे रणजित पाटील यांनी आक्षेप अर्ज दाखल केल्यानंतर अवैध मतांची फेरमोजणी करण्यात आली. यात २१४ वैध मतांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा देखील वाढला आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला १,०२,४०३ मतदान झाले आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चार व अपक्ष १९ असे एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी येथील नेमाणी गोडावूनमध्ये मतमोजणीला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून धीरज लिंगाडे व रणजित पाटील यांच्यात चुरस होती. मात्र, प्रत्येक फेरीमध्ये लिंगाडे यांनी आघाडी घेतली आहे. विजती मतांचा कोटा पूर्ण करण्यास धीरज लिंगाडे यांना ३५८१ व रणजित पाटील यांना ५९१५ मते कमी आहेत. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अमलकर यांना पहिल्या पसंतीचे ४१८४ मते मिळाली ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.रात्री १ वाजतानंतर दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. यात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांची विजयाकडे घौडदौड सुरू झाली आहे. पहाटेच्या सुमारास अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.