विदर्भात वाघांच्या तृष्णेसाठी वनविभागाची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:42 AM2018-04-04T11:42:12+5:302018-04-04T11:42:29+5:30
यंदा उन्हाळा अधिक तापणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.
गणेश वासनिक।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजिवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पहिल्यांदाच मार्चमध्येच नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने यावर्षी विदर्भातील वाघांची तृष्णा भागविणे वनविभागासाठी जिकरीचे ठरणार आहे.
राज्यातील एकूण सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात, तर सह्याद्री पश्चिम महाराष्ट्रात आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नैसर्गिक पाणवठे पाणी आटू लागल्याने कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती युद्धस्तरावर केली जात आहे. मेळघाट, ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पात पाणीसमस्या गंभीर स्वरूप धारण करणार आहे. परिणामी काही भागात टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजनदेखील करण्यात आले. वाघांची तहान भागविताना निधीची कमतरता पडू नये, याची दक्षता वनाधिकारी घेत आहेत.
रान धगधगत आहे. काही जंगलांना आगी लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे हे दोन महिने वन्यजिवांचे संरक्षण करताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.
जंगलात ५ ते १० कि.मी. अंतरावर कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत. काही पाणवठ्यांवर सौरऊर्जेवर स्वयंचलित हातपंपाद्वारा पाणीपुरवठा केला जाईल. कृत्रिम पाणवठे तयार करताना प्लास्टिकचे आवरण, माती व पाणी साठवण्याची व्यवस्था राहणार आहे. हल्ली व्याघ्र प्रकल्पात विशिष्ट ठरावीक भागातच नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यामुळे वन्यजिवांची एका भागातून दुसऱ्या भागात पाण्यासाठी भटकंती होऊ नये यानुसार कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली जात आहे.
विषप्रयोगाच्या तपासणीसाठी ‘लिटमस’ पेपर
कृत्रिम पाणवठ्यात विषप्रयोग करून वन्यजीवांची शिकार करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यातील पाणी १२ तासांपेक्षा अधिक काळ साठवून राहता कामा नये. पाणवठ्यात कुणी विषप्रयोग केला असेल, तर ते तपासून पाहण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना तांबडा लिटमस पेपरचा वापर करण्याच्या सूचना आहेत. पाणवठ्यात विष टाकले असेल, तर लिटमस पेपरचा रंग लाल होतो, या विषप्रयोग तपासणीच्या टिप्स आहेत.
वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही, ही दक्षता घेतली जात आहे. व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यासोबतच शिकाऱ्यांवरही लक्ष आहे.
- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर.