पोहरा-चिरोडीत सफारीदरम्यान पट्टेदार वाघांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:02 AM2017-11-16T00:02:21+5:302017-11-16T00:02:46+5:30
जिल्ह्यातील पोहरा-चिरोडी वनक्षेत्रात निसर्ग सफारी प्रारंभ होताच दुसऱ्या दिवशी पर्यटकांना पट्टेदार वाघोबाचे दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला.
अमोल कोहळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा : जिल्ह्यातील पोहरा-चिरोडी वनक्षेत्रात निसर्ग सफारी प्रारंभ होताच दुसऱ्या दिवशी पर्यटकांना पट्टेदार वाघोबाचे दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला.
अमरावती वनविभाग व पोहरा संयुक्त वनव्यवस्थापन समितीने जंगल सफारीबाबत उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांच्याकडे मागणी रेटून धरली होती. त्यानुसार मिणा यांनी पोहरा-चिरोडी जंगल सफारी प्रारंभ केली आणि दोन दिवसांत पर्यटकांचा लोंढा सफारीकरीता वाढल्याचे दिसून आले.
पर्यटन सहलीच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पर्यटकांचे तीन वाहने पोहरा तलावाच्या भागात गेली आणि त्यांना चक्क पट्टेदार वाघ दृष्टीस पडला. पोहरा- चिरोडी जंगलात वाघ दिसल्याने या सर्वपर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि पर्यटकांचे फलित झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला. या जंगल सफारीतून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
अन्य वन्य पशू,पक्षांचेही वास्तव्य
पोहरा- चिरोडी जंगलात वाघ, बिबटसह चित्तळ, रोही, निलगाय, चिकारा, रानडुक्कर, मोर, बेडकी, काळवीट, सायाळ, ससे, मोर आदी वन्यजिवांचे वास्तव्य आहे. जंगल सफारीतून स्थानिकांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले आहे.
पोहरा-चिरोडी जंगलात आम्ही निसर्ग सहलीला गेलो. अपेक्षा नसताना डोळ्यांनी पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आणि अमरावती शहरानजीकचे हे जंगल खरोखरचं वैभवसंपन्न असल्याचे शिक्कामोर्तब झाले.
- मधुकर चौधरी,
पर्यटक
मला खूप आनंद झाला. पट्टेदार वाघ खरोखरच मी डोळ्यांनी पाहिला आणि आमच्यासोबत गाईड नंद असून त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. पट्टेदार वाघ पाहिल्याने मला अत्यानंद झाला.
- अरविंद ढोले,
पर्यटक
पट्टेदार वाघ बघून मनस्वी आनंद झाला. पोहरा-चिरोडी जंगलात पट्टेदार वाघ असल्याचे ऐकिवात होते. मात्र, मंगळवारी प्रत्यक्षात वाघाचे दर्शन घडल्याने या जंगलाचे वैभव अतिशय नयनरम्य आहे.
- विजय गावंडे,
पर्यटक