कापूसतळणी येथे ग्राम कृषी संजीवनी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:25+5:302021-06-26T04:10:25+5:30
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण मुळे, मंडल कृषी अधिकारी कापूसतळणी यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय चवाळे, जिल्हा ...
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण मुळे, मंडल कृषी अधिकारी कापूसतळणी यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती हे होते; तर प्रमुख पाहुणे जी. टी. देशमुख उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर, तालुका कृषी अधिकारी मनोहर कोरे व अध्यक्षा म्हणून सरपंच अक्षताताई खडसे या उपस्थित होत्या.
‘कापूस एक गाव एक वाण’ याविषयी बोलताना विजय चवाळे यांनी समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, वेगवेगळ्या घटकांतर्गत लाभ घेऊन स्वत:बरोबरच इतरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
तर जी. टी. देशमुख यांनी पोकराअंतर्गत वेगवेगळ्या घटकांचा लाभ घेण्यासाठी असलेला वाव याबद्दल माहिती दिली.
या प्रसंगी बोलताना मनोहर कोरे यांनी सप्ताहाच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करून सर्व तालुक्यांत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार बांधावर पोहोचून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा अक्षताताई खडसे यांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांबरोबरच नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेती करावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी गजानन मोरे, कृषी पर्यवेक्षक एस. पी. हूड, शेतीशाळा समन्वयक रूपेश हरणे, बी. टी. एम., वानखडे शेतीशाळा प्रशिक्षक, कमलेश उके, समूह साहाय्यक सुमेध वाहुळे, ग्रामपंचायत सदस्य किशोर खडसे, पक्षिमित्र तथा कृषिमित्र अरुण शेवाणे, प्रशांत सरदार व शेतकरी उपस्थित होते.
मारोती जाधव कृषी साहाय्यक तथा कृषी पर्यवेक्षक (प्रभारी) यांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.