गावस्तरीय ग्राम दक्षता समित्या निष्क्रिय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:23+5:302021-04-13T04:12:23+5:30
अमरावती : कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनेच्या दृष्टीने ग्राम दक्षता समितींची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या ...
अमरावती : कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनेच्या दृष्टीने ग्राम दक्षता समितींची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या बहुतांश गावांत निष्क्रिय असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. त्यामुळे गावागावांतील कोरोना संदर्भातील उपाययोजना योग्य प्रमाणात राबविल्या जात नाही. भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन पुन्हा एकदा या समित्या ॲक्टिव्ह करणे गरजेचे वाटू लागले आहे.
शासनादेशाचे आणि सूचनांचे काटेकोर पालन व्हावे, ग्रामीण भागात कोरोना संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने गावपातळीवर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. सरपंच समितीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी व गावातील काही जणांची समितीत नियुक्त करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कोरोना काळात या समित्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून चांगली कामगिरी केली. त्याची दखल घेत समित्यांना शासनाच्या सूचनेप्रमाणे दंडीत करण्याचे अधिकार दिले. त्यातून अनेक जणांवर कारवाईसुध्दा करण्यात आली. त्यामुळे समितीचा चांगला जोम गावोगावी बसला होता. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे समित्यांना मरगळ आली. त्यातच मध्यंतरी जिल्ह्यातील ५०० हून अधिक गावात निवडणुकीचे वातावरण होते. सत्ताबदल झाल्याने गाव कारभारी बदलले. दररोज झपाट्याने कोरोना बाधिताची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासनाने नवीन नियमावली लागू केली. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र ग्राम दक्षता समिती निष्क्रिय झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाहेरगावाहून, राज्यातून, परदेशातून येणाऱ्यांवर तेवढा वॉच राहिलेला नाही. आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका काम करीत असल्याने ग्राम दक्षता समित्यांचे पदाधिकारी निवांत आहेत. मात्र, अद्याप समितीतील पदाधिकारी व सदस्यांनाही वाटणारा धोका ओळखून आता समितीने नव्या दमाने कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी पुन्हा सक्रिय होण्याची गरज आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांनी घ्यावा पुढाकार
जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावातील नवीन सरपंच निवडी मध्यंतरी झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गावाच्या कारभाराची सूत्रे गेली आहेत. गावचे सरपंच ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे आता नवीन कारभाऱ्यांनी गावाच्या सुरक्षिततेसाठी कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखण्यासाठी पुढाकार घेऊन ग्राम दक्षता समिती ॲक्टिव्ह करणे गरजेचे झाले आहे.