नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी गावोगाव ग्रंथचळवळ निर्माण व्हावी : यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 12:10 PM2022-04-11T12:10:59+5:302022-04-11T12:13:19+5:30

विभागीय ग्रंथालयातर्फे महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहात ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या.

Village Library Movement should be formed to make the new generation oriented towards reading: yashomati thakur | नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी गावोगाव ग्रंथचळवळ निर्माण व्हावी : यशोमती ठाकूर

नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी गावोगाव ग्रंथचळवळ निर्माण व्हावी : यशोमती ठाकूर

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचा शुभारंभ

अमरावती : वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होऊन प्रगतीची दिशा खुली होते. त्यामुळे नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी गावोगाव ग्रंथचळवळ निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केले.

विभागीय ग्रंथालयातर्फे महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहात ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हा वार्षिक योजना नावीन्यपूर्ण योजनेत काही ग्रामपंचायतींना स्पर्धा परीक्षा पुस्तक संच वितरण या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी, विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील, सहायक संचालक अरविंद ढोणे, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख व विविध ग्रामपंचायतींचे सरपंच या वेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, वाचन केले तरच ज्ञानाची, नव्या माहितीची दारे खुली होतील. त्यासाठी पुस्तकांची गोडी नव्या पिढीत निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ग्रंथचळवळ रुजविण्यासाठी व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आदी साहित्य गावातच उपलब्ध व्हावे यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून प्राप्त पुस्तकांचा सदुपयोग व्हावा, यासाठी गावोगाव प्रयत्न व्हावेत. सर्वांनी पुढाकार घेऊन नव्या पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच स्पर्धा परीक्षा साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतींना पुस्तक संच वितरण प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे, असे मडावी यांनी सांगितले.

ग्रंथप्रदर्शनातील पुस्तकांचे अवलोकनही या वेळी पालकमंत्र्यांनी केले. प्रदर्शनात विविध विषयांवरील महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. हे ग्रंथप्रदर्शन १२ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहील, असे पाटील यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Village Library Movement should be formed to make the new generation oriented towards reading: yashomati thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.