वाढोण्यात गावगाड्याचे राजकारण; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थांबले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:27 PM2024-09-09T12:27:18+5:302024-09-09T12:27:48+5:30
Amravati : सरपंचपदाच्या भांडणात बँक खातेबदल करण्याचा ठराव नामंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाढोणा रामनाथ : स्थानिक ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. कारण गावगाड्याच्या राजकारणात सरपंचाच्या नावे बँक खातेबदल करण्याचा ठराव नामंजूर झाला. दोन महिन्यांपूर्वीच पदावर विराजमान झालेल्या सरपंचाच्या गोटात पाच, तर विरोधात सहा सदस्य आहेत.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोण्याच्या सरपंचपदी दोन महिन्यांपूर्वी सविता तिरमारे यांची निवड झाली. तेव्हापासून बैंक खातेबदल रखडला. त्यामुळे गावातील संपूर्ण विकासकामे थांबली आहेत. ग्रामपंचायतमध्ये एकूण अकरा सदस्य आहे.
त्यापैकी पाच सदस्य सरपंच तिरमारे यांच्याकडे, तर सहा सदस्य विरोधात आहेत. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये बँक खातेबदल करण्यासाठी ठराव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी वाघोडे यांनी तसा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविला. पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला. परंतु, आजपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
त्यातच कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा झाले नाही. सरपंचांना पैसे खर्च करण्याचे अधिकार नाहीत. वाढोण्यात गेल्या तीन वर्षांपासून सरपंचपदासाठी न्यायालयीन वाद झडत आहेत. तो अजूनही थांबला नाही. जिल्हा परिषद यावर कुठली कायदेशीर कारवाई करणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
"ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आला आहे. तो जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. लवकरच कारवाई होईल."
- संजय झंजाड गटविकास अधिकारी, नांदगाव खंडेश्वर