गावकऱ्यांनी साकारले पाणीदार गाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 09:40 PM2018-08-27T21:40:34+5:302018-08-27T21:40:50+5:30
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे.
संजय जेवडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात या गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिनेअभिनेता आमिरखान, किरण राव, चित्रपट निर्माते आषुतोष गोवारीकर, अभिनेते गिरीश कुळकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाणी फाऊंडेशनतर्फे १० लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये या गावाला अतिरिक्त पुरस्कार देण्यात येणार आहे.
स्पर्धेत राज्यस्तरावर १६ गावात निवड झालेले अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (बैनाई) हे एकमेव गाव आहे. या स्पर्धेदरम्यान या गावाने १३४ शोषखड्डे, २४०० झाडांची रोपवाटिका, ९ हजार घनमिटरचे काम गावकऱ्यांच्या श्रमदानाद्वारे तसेच ९० हजार घनमीटर काम यंत्राद्वारे करण्यात आले. यात ३८ शेततळे, १५०० मीटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, सुमारे ३६०० मीटर लांबीचे शेतातील बांध इत्यादी कामाचा समावेश आहे. या कामाद्वारे गावाने १० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी अडविण्याची क्षमता केवळ ४५ दिवसांत निर्माण केली. ८ एप्रिल ते २२ मे पर्यंतच्या कालावधीत सातत्याने या गावातील गावकºयांनी एकजुटीने श्रमदान करून ही किमया घडविली. उल्लखनीय बाब म्हणजे या गावातील मुस्लीम बांधवांनी प्रार्थनस्थळावर शोषखड्डा खोदून वाहून जाणारे पाणी अडविले तसेच या समाजातील महिला देखील श्रमदानात अग्रेसर राहिल्या. यानिमित्त विविध धर्माची व समाजाची मंडळी एकजुटीने या कामाला लागल्याने गावात एकोपा निर्माण झाला आह.े.
पाणी फाऊंडेशनमधील कामाच्या निमित्ताने गावात निर्माण झालेला एकोपा व वाढलेली भूजल पातळी ही खरी जमेची बाजू आहे.
- शरयू अजय पंडीत
सरपंच, पिंपळगाव बैनाई.
पिंपळगाव बैनाई हे गाव राज्यस्तरावर झळकले असून यापुढेही गावकºयांच्या सहकार्यातून या कार्याचे सातत्य आम्ही कायम ठेवू.
- श्रीकृष्ण राऊत
उपसरपंच, पिंपळगाव बैनाई.
पिंपळगाव बैनाई, मोखड, काजना व तालुक्यातील इतर २३ गावकºयांनाही श्रमदानातून पाणीदार गावे साकारली. आता तालुक्यातील इतर गावांनीसुद्धा कित्ता गिरवावा.
- मनोज लोणारकर,तहसीलदार