महेंद्री-पंढरी जंगल क्षेत्रातील ग्रामस्थांचा अभयारण्याला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 08:16 PM2020-10-17T20:16:39+5:302020-10-17T20:23:04+5:30
वरुड : तालुक्याचे वैभव असलेल्या महेंद्री-पंढरी वनक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांनी प्रस्तावित महेंद्री अभयारण्यास विरोध दर्शविला आहे. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी जंगल पाहणी करून ...
वरुड : तालुक्याचे वैभव असलेल्या महेंद्री-पंढरी वनक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांनी प्रस्तावित महेंद्री अभयारण्यास विरोध दर्शविला आहे. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी जंगल पाहणी करून सकारात्मता दर्शविली. मात्र, ग्रामस्थांनी बैठका घेऊन नकारात्मक सूर लावला आहे. अभयारण्य झाल्यास आरपारची लढाई लढण्याचा इशारा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
वरूड तालुक्यात १० हजार हेक्टरपेक्षा मोठे वनपरिक्षेत्र आहे. या जंगलास सातपुड्याची किनार लाभली आहे. या जंगलात वाघ, अस्वल, रानडुक्कर, हरिण, बिबट, मोर, सायाळ, रोही आदी प्राणी मुक्त विहार करतात. पक्षीसुद्धा आहेत. शेकदरीपासून महेंद्री, लिंगा, एकलविहीरपर्यंत विस्तीर्ण घनदाट असे वनक्षेत्र आहे. यामुळे वनविभागाने या क्षेत्राची अभयारण्याकरिता हालचाल सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्त्वत: मंजुरी दिल्याची घोषणा केली.
प्रधान वनसंरक्षकांनी या वनक्षेत्राचा दौरासुद्धा केला. माजी मंत्री अनिल बोंडे यांनी वनविभागाला पत्र देऊन अभयारण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल; आदिवासी लोकांवर बेरोजगारी येऊन या परिसरात उद्योगधंदे येणार नाहीत, असे म्हटले आहे. या परिसरातील महेंद्री, जामगाव, कारवार, लिंगा, पिपलागढसह काही गावांतील लोकांनी बैठका घेऊन विरोध दर्शविला आहे.
काय म्हणाले ग्रामस्थ?
अभयारण्यामुळे आमचा उद्योग बुडेल. जंगल परिसरातून मिळणारा रोजगार थांबेल तसेच शेतकऱ्यांना जनावरांचा त्रास वाढेल. आम्हाला शेतात ये-जा करता येणार नाही. गावांचे भूसंपादन व पुनर्वसन करावे लागेल. पर्यायाने आम्ही बेरोजगार होऊ, असे वनाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले. मेळघाटातील आदिवासी व वनविभागातील संघर्ष जिल्हावासी पाहत आहेत. तो संघर्ष आम्हाला नको, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.