पिंपळखुटा, येवती ग्रामस्थ नुकसानभरपाईपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:11 AM2021-04-15T04:11:57+5:302021-04-15T04:11:57+5:30
मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा (मोठा) व येवती या गावांतील शेतकरी सन २०१९ ते २०२० या कालावधीत गारपीट व अवकाळी ...
मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा (मोठा) व येवती या गावांतील शेतकरी सन २०१९ ते २०२० या कालावधीत गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. येत्या आठ दिवसांत भरपाईची रक्कम न दिल्यास रास्ता रोको व त्यानंतर बेमुदत उपोषण करू, असा इशारा कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय अकोलकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पिंपळखुटा (मोठा) व येवतीसह मोर्शी तालुक्यात डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत गारपीट, अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. शासनादेशानुसार नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण पार पडले. करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. त्या अनुषंगाने नुकसानभरपाईचे ३४ कोटी ३५ लाख २४ हजारांचे अनुदान धनादेश तहसील कार्यालयाला पाठविण्यात आले. मात्र, पिंपळखुटा (मोठा) व येवती या गावातील शेतकरी धनादेशापासून वंचित आहेत. संबंधित तलाठ्यांनी या दोन्ही गावांच्या याद्या दिल्याच नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. तहसीलदारांकडे मुदतीत नुकसानग्रस्तांच्या याद्या सादर केल्या असत्या, तर पिंपळखुटा (मोठा) व येवती येथील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले नसते. तहसीलदारांनीही वेळीच दखल घेऊन तलाठ्याला नोटीस बजावून शेतकऱ्यांच्या याद्या दाखल करावयास पाहिजे होत्या. मात्र, तहसीलदारांनी तलाठ्याला निलंबित करून घोंगडे झटकले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मोर्शी दौऱ्यादरम्यान पिंपळखुटा (मोठा) येथील सरपंच, उपसरपंच व शेतकरी यांनी त्यांना स्मरणपत्र देऊन मागील प्रकरणाची जाणीव करून दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीही अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन फोल ठरल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.
याप्रसंगी पिंपळखुटा मोठा येथील सरपंच शुभांगी मोगरकर, आशिष मोगरकर, अविनाश बोबडे, प्रवीण वाघमारे, मोहन जीकाटे, कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय अकोलकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.