गावातल्यांनी खोट्या रिपोर्टची धमकी दिली; फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या केली
By प्रदीप भाकरे | Updated: March 8, 2024 14:59 IST2024-03-08T14:41:47+5:302024-03-08T14:59:47+5:30
वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. दरम्यान त्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मृताच्या कुटुंबियांचे बयान नोंदविण्यात आले.

गावातल्यांनी खोट्या रिपोर्टची धमकी दिली; फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या केली
अमरावती: गावातीलच तिघा चौघांनी खोटा रिपोर्ट देऊन त्यात अडकविण्याची धमकी दिल्याने एका ५० वर्षीय गृहस्थाने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नया अकोला येथे ती घटना घडली होती. याप्रकरणी, वलगाव पोलिसांनी ७ मार्च रोजी रात्री १०.३१ वाजता आरोपी निखिल सपाटे (३२), सुभाष साबळे (५५) व दोन महिला (सर्व रा. नया अकोला) यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गंगाधर सपाटे (५०, रा. नया अकोला) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या पत्नीने तक्रार नोंदविली.
पोलीस तक्रारीनुसार, १५ नोव्हेंबर २०२३ रोजी फिर्यादी महिलेचा पुतण्या निखील सपाटे, त्याची महिला नातलग व सासरे सुभाष साबळे यांनी महिलेचा मुलगा सागर सपाटे याला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच महिलेला देखील शिवीगाळ करुन मोटर सायकलने धक्का देऊन खाली पडले. आरोपींनी गंगाधरराव यांना सुध्दा शिवीगाळ केली. तसेच लोटलाट करुन ईज्जत लुटण्याचा खोटा रिपोर्ट देण्याची धमकी दिली. त्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून गंगाधरराव सपाटे यांनी घरात ठेवलेले फवारणीचे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी, वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
दरम्यान त्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मृताच्या कुटुंबियांचे बयान नोंदविण्यात आले. त्यातून गंगाधरराव यांना आरोपींनीच आत्महत्येस प्रवृत्त केले, असे समोर आले. त्याआधारे पोलिसांनी ७ मार्च रोजी याप्रकरणी चार आरोपींविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वलगावचे ठाणेदार वैभव पानसरे यांनी ‘लोकमत’ला दिली.