चोरांच्या भीतीने जागे राहते गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:32 PM2017-10-26T23:32:20+5:302017-10-26T23:32:31+5:30
परिसरात दिवाळी सणापूर्वीच चोरांचा बाजार गरम झाला असून, अफवांचे पेव फुटले आहे. पकडल्यानंतर अचानक अदृश्य होणाºया या चोरांचा डोळा संपत्तीवर नव्हे, तर महिला-तरुणींवर असल्याचे....
रितेश नारळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुºहा : परिसरात दिवाळी सणापूर्वीच चोरांचा बाजार गरम झाला असून, अफवांचे पेव फुटले आहे. पकडल्यानंतर अचानक अदृश्य होणाºया या चोरांचा डोळा संपत्तीवर नव्हे, तर महिला-तरुणींवर असल्याचे कर्णोपकर्णी झाल्याने प्रत्येकाच्या डोळ्यांतील झोप उडाली आहे. गावकरी गेल्या २० दिवसांपासून आळीपाळीने रात्र जागून काढत आहेत. चोरांच्या भीतीपोटी ग्रामस्थांना दिवाळीचा आनंदही लुटता आलेला नाही.
कुुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजी या गावापासून प्रकरणाला सुरुवात झाली व अंंजनसिंगी, कुºहा मार्डी, चेनुष्ठा शिवारात पसरली. हे चोर रात्री ८ ते १२ च्या चार-पाचच्या समूहाने सुमारास येतात, असा लोकांचा दावा आहे. काही जणांनी त्यांना पाहिले. पाठलाग केला असता ते दिसेनासे झाले असल्याची चर्चा गावात सुरू आहे. ते गावाच्या टोकावरील घरे व झोपडपट्टी परिसर हेरतात, असेही याप्रकरणी पुढे आले आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवून कुºहा परिसरात ग्रामस्थांचे जागरण सुरू आहे. काही गावांमध्ये मांत्रिकांना पाचारण करण्यात आले असल्याची माहिती आहे.
सहा जणांना नाहक मिळाला चोप
चोरांच्या अफवेने चार दिवसांपूर्वी मार्डी गावात सहा बहुरूपींना ग्रामस्थांकडून मारहाण झाली होती. हे लोक टोळक्याने दिवाळीची बक्षिसी मागण्यासाठी आले होते. ग्रामस्थांनी त्यांना बदडले व पोलिसांच्या हवाली केले. तपासणीत ते चोर नसल्याचे सिद्ध झाले.