७२११ गावे बाधित, पैसेवारी ४६; खरीप हंगामाच्या अंतिम पैसेवारीत पिकांची स्थिती स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:25 PM2020-01-01T17:25:16+5:302020-01-01T17:25:25+5:30
यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी गुरुवारी जाहीर केली.
गजानन मोहोड
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी गुरुवारी जाहीर केली. यानुसार पाचही जिल्ह्यांत सरासरी ४६ पैसेवारी आहे. या सर्व जिल्ह्यांतील ७२११ दुष्काळबाधित गावांना आठ प्रकारच्या सवलती निकषाने लागू होतील. यापूर्वी महसूल विभागाद्वारे नजरअंदाज व सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आलेली होती. यामध्ये पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त होती. त्यामुळे विभागातील शेतक-यांचे खरिपाच्या अंतिम पैसेवारीकडे लक्ष लागले होते. विभागातील पाचही जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यात पैसेवारी जाहीर केली व अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला. त्यानुसार आयुक्तांनी विभागाची पैसेवारी ४६ असल्याचे जाहीर केले आहे.
केंद्र शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१७ नुसार दुष्काळाची परिभाषा निश्चित केली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या निर्देशांकानुसार आता दुष्काळ जाहीर केला जातो. त्यामुळे पैसेवारीच्या प्रचलीत पद्धतीने दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत आता दुष्काळ जाहीर होणार नसला तरी खरीप हंगामाचे वास्तववादी चित्र या पैसेवारीने स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शासनाने या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.
ऑक्टोबरच्या अवकाळीत २२ लाख हेक्टर बाधित
पश्चिम विदर्भात १७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने २० लाख २५ हजार १९७ शेतक-यांच्या २२ लाख ४४ हजार ३९८ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३ लाख ७३ हजार ३५० हेक्टर, अकोला ३ लाख ६९ हजार ७१९, यवतमाळ जिल्ह्यात ५ लाख २३ हजार ४७५, बुलडाणा जिल्ह्यात ६ लाख ९० हजार ४८८ व वाशिम जिल्ह्यात २ लाख ८७ हजार १६४ हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जिल्हानिहाय जाहीर पैसेवारी
जिल्हा बाधित गावे पैसेवारी
अमरावती १९६१ ४६
अकोला ९९० ४५
यवतमाळ २०४८ ४७
वाशिम ७९३ ४७
बुलडाणा १४१९ ४३
एकूण ७२११ ४६