‘कुं कू’ वाचविण्यासाठी विमलबार्इंची धडपड
By admin | Published: June 28, 2014 12:23 AM2014-06-28T00:23:46+5:302014-06-28T00:23:46+5:30
पतीला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन वार्धक्यात आयुष्याच्या सोबत्याची संगत हिरावते की काय, ही भीती त्यांना वाटू लागली. पण...
गणेश वासनिक अमरावती
पतीला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन वार्धक्यात आयुष्याच्या सोबत्याची संगत हिरावते की काय, ही भीती त्यांना वाटू लागली. पण, त्यांनी पराभव पत्करला नाही. त्या लढल्या. सतत तीन वर्षांचे परिश्रम आणि औषधोपचारामुळे त्यांचे पती कर्करोगातून सावरले असले तरी पुढील उपचारासाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील माधान येथील रहिवासी प्रभाकर दत्तुबाजी बाहे (७५) यांना वयाच्या ७२ व्या वर्षी कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. घरी दोन एकर शेती. तरीही मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नाही. कर्करोग म्हणजे साक्षात मृत्यू.
उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कोठून करणार?, अशा एक ना अनेक समस्या प्रभाकर दत्तुबाजी बाहे यांच्या अर्धांगिनी विमलाबार्इंना सतावत होत्या. तरीदेखील पतीचा कॅन्सर बरा व्हावा, मृत्यूच्या कराल दाढेतून त्यांना बाहेर काढावे, यासाठी त्यांनी धडपड सुरु केली.
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात प्रभाकर बाहे यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना अन्यत्र नेण्याचे सांगण्यात आले. अशा वेळी काय करावे, हा पेच विमलाबार्इंना पडला. परंतु काहीही झाले तरी ‘कुंकू’ वाचवायचेच अशी खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली.
अखेर राजीव गांधी आरोग्य सेवादायी योजनेंतर्गत येथील विदर्भ सेवासंदर्भ रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे प्रभाकरराव बाहे यांच्यावर उपचार सुरु झाले.
प्रारंभी तीन टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या कानाखाली सुपारीच्या आकाराची असलेली गाठ किमोथेरेपीदरम्यान आपोआप नष्ट झाली. गाठ नष्ट झाल्याने विमलबार्इंना मोठा दिलासा मिळाला. मात्र, कर्करोग पूर्णपणे बरा झाला नव्हता.
आतापर्यत प्रभाकरावांवर सहा किमोथेरपी करण्यात आल्या आहेत. उपचारासाठी बाहे दाम्प्त्याला कॅन्सर तज्ज्ञ राजेंद्रसिंग अरोरा यांचे सहकार्य लाभत आहे.
विमलबाई या न चुकता प्रभाकररावांना केमोथेरेपीसाठी (तपासणी) सतत घेऊन येत असल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची चमूदेखील अवाक् झाली. विमलाबार्इंचा हा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. पतीला कॅन्सरमुक्त करण्याची त्यांची धडपड अविरत सुरूच आहे.