Deepali Chavan Suicide Case : दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी आरोपी विनोद शिवकुमारला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 02:40 PM2021-03-27T14:40:07+5:302021-03-27T14:49:35+5:30
Deepali Chavan Suicide Case : लोकांमध्ये असलेला संताप व असंतोष पाहता न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
अमरावती - धारणी तालुक्यातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (Deepali Chavan Suicide Case) यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला २९ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास त्याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात धारणी न्यायालयात आणण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर मोठा जनसमुदाय एकत्र आला होता. लोकांमध्ये असलेला संताप व असंतोष पाहता न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. न्यायालयाबाहेर आरोपी विनोद शिवकुमारला फाशी देण्याची मागणी करत त्याचे छायाचित्र जाळण्यात आले. निदर्शने करण्यात आली.
दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक (डीएफओ) विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री तीनच्या सुमारास धारणी पोलिसांनी शिवकुमार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. वनविभागातच नव्हे तर, सोशल मीडियावरही ‘जस्टिस फॉर दीपाली चव्हाण’ अशी मागणी बुलंद झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांच्या भूमिके विरोधातदेखील संताप व्यक्त होत आहे.
रात्री-बेरात्री बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न; डीएफओ शिवकुमारला अटक
दीपाली यांनी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी छातीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. दीपाली दोन वर्षांपासून हरिसाल येथे कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेश मोहिते (३०, रा. मोरगाव, जि. अमरावती) हे चिखलदरा येथे कोषागार कार्यालयात नोकरीला आहेत.
सुसाईड नोटमध्ये काय?
दीपाली यांनी ज्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली, तेथे धारणी पोलिसांना सुसाईट नोट मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या नावे लिहिलेले हे तीन पानी पत्रात त्यांनी शिवकुमारकडून होत असलेल्या त्रासाबद्दल सविस्तर लिहिले आहे. प्रशासकीय जाच, रात्री-बेरात्री संकुल, अकोट फाट्यावर बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न, सहकाऱ्यांदेखत होणारी अश्लील शिवीगाळ, शिवकुमार यांनी जाणूनबुजून जंगल फिरविल्याने गर्भपात झाल्याचे म्हटले आहे. आत्महत्येला शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई कराल, हीच शेवटची इच्छा, असे नमूद आहे.
Deepali chavan suicide case: मला कच्च्या रस्त्यावरून फिरवलं, त्यामुळे गर्भपात झाला; दीपाली चव्हाण यांचा धक्कादायक आरोप pic.twitter.com/dwuDam0u1a
— Lokmat (@MiLOKMAT) March 26, 2021