विनोद शिवकुमार बाला, रेड्डींच्या पोस्टरचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 05:00 AM2021-03-29T05:00:00+5:302021-03-29T05:00:52+5:30
‘दीपाली चव्हाण अमर रहे’, ‘एम. एस. रेड्डी मुर्दाबाद’, ‘विनोद शिवकुमार मुर्दाबाद’ असे नारे लावत दोघांच्या फोटोंना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी चपलेचा प्रसाद दिला. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वत्र या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला फाशी देण्यासह त्याला बळ देणाऱ्या एम.एस. रेड्डींना निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी वनपाल वनकर्मचारी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी/ चिखलदरा : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात वन कर्मचाऱ्यांनी हरिसाल येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता मेळघाटचे तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी आणि निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला यांचे पोस्टर लावून होळीचे दहन केले.
‘दीपाली चव्हाण अमर रहे’, ‘एम. एस. रेड्डी मुर्दाबाद’, ‘विनोद शिवकुमार मुर्दाबाद’ असे नारे लावत दोघांच्या फोटोंना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी चपलेचा प्रसाद दिला. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वत्र या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला फाशी देण्यासह त्याला बळ देणाऱ्या एम.एस. रेड्डींना निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी वनपाल वनकर्मचारी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली आहे.
खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवि राणा यांच्याकडे रविवारी वनपाल व वनकर्मचाऱ्यांनी व्यथा मांडल्या. मोठ्या प्रमाणात वनविभागातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अनेक ‘दीपाली’ आहेत वनविभागात
रविवारी हरिसाल येथे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करताना उपस्थित काही महिला कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. गावकरी व अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. विनोद शिवकुमार बालाचे अनेक कारनामे यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.
क्रूर प्रवृत्तीचे दहन
आरोपी विनोद शिवकुमार बाला व अन्य अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून अजूनही कुणी महिला कर्मचारी व इतर कर्मचारी बळी पडू नये, त्या राबवून घेण्याच्या क्रूर प्रवृत्तीचे दहन करण्याचा निर्णय वनपाल वनरक्षक संघटनेने घेतला. या क्रूर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचे पोस्टर होळीला गुंडाळून जाळण्यात आले. वनपाल, वनकर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेचे विविध पदाधिकारी कर्मचारी, गावकरी उपस्थित होते.
‘लोकमत’ वृत्ताची चर्चा
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ‘लोकमत’मधील वृत्ताची सर्वत्र चर्चा होती. श्रीनिवास रेड्डी यांच्याबद्दल चांगले लिहून देण्यासाठी टाकण्यात आलेल्या दबावाचे प्रकाशित वृत्त चांगलेच चर्चेत होते.
एसीत बसून जंगलाचे संरक्षण
श्रीनिवास रेड्डी यांच्या कार्यालयातील या महिला कर्मचारी असून त्यातील काहींना ११ महिन्यांची ऑर्डर आहे. चार ते पाच वर्षांपासून त्या तेथेच ठाण मांडून आहेत. काही महिला कर्मचारी मेळघाटात कार्यरत असून, त्यांची प्रतिनियुक्ती रेड्डींच्या कार्यालयात आहे. एसीत बसून जंगलाचे काम करणाऱ्या या महिलांबद्दल प्रचंड संताप संघटनांनी व्यक्त केला. मंगळवारी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना व इतर संघटनांच्यावतीने त्यांना जाब विचारला जाणार आहे.
कुठल्याच दबावातून वनकर्मचारी अधिकाऱ्यांनी हुजेरीगिरी करू नये, काही महिलांनी तसे लिहून दिले. त्यानंतर दबावातून हा प्रकार असल्याचे त्यांनी फोनवर सांगितले. यासंदर्भात मंगळवारी अमरावती येथे संघटनेच्यावतीने निषेध नोंदवण्यात येणार आहे.
- प्रदीप बाळापुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना अमरावती