विनोद शिवकुमार १०५ दिवसांनंतर कारागृहातून बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:57+5:302021-07-16T04:10:57+5:30
उच्च न्यायालयातून सशर्त जामीन, गुरुवारी सायंकाळी सोपस्कार आटोपून रवाना अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य ...
उच्च न्यायालयातून सशर्त जामीन, गुरुवारी सायंकाळी सोपस्कार आटोपून रवाना
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा १०५ दिवसांनंतर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला, हे विशेष.
दीपाली यांनी २५ मार्च २०२१ राेजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावरून पळून जात असताना विनोद शिवकुमार याला २६ मार्च ताब्यात घेतले. धारणी पोलिसांनी अटक करून आत्महत्याप्रकरणी गुन्हे नाेंदविले. यादरम्यान धारणी कनिष्ठ न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर १ एप्रिल २०२१ रोजी विनोद शिवकुमार याची येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयाच्या आदेशानुसार रवानगी करण्यात आली. अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात त्याने वकिलांमार्फत जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर १४ जुलै रोजी नागपूर उच्च न्यायालयाने विनोद याला जमीन मंजूर केला आहे. १ एप्रिल ते १५ जुलै या दरम्यान तो मध्यवर्ती कारागृहात १०५ दिवस गजाआड राहिला.
--------------
कोट
न्यायालयाच्या आदेशानुसार विनोद शिवकुमार याला गुरुवारी सायंकाळी सोडण्यात आले आहे. तो उपवनसंरक्षक असला तरी कारागृहात कैद्याचीच वागणूक दिली गेली. एकंदरीत १०५ दिवसांनंतर तो पाषाण भिंतीबाहेर जात आहे.
- पांडुरंग भुसारे, प्रभारी अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह.