विनोद शिवकुमारची अमरावती कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:05+5:302021-03-31T04:14:05+5:30
३०एएमपीएच२९ - विनोद शिवकुमार चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण धारणी : हरिसाल वनपरिक्षेत्र ...
३०एएमपीएच२९ - विनोद शिवकुमार
चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
धारणी : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी गुगामाल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मंगळवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात त्याला धारणीहून अमरावतीला हलविण्यात आले.
विनोद शिवकुमार याला शनिवारी दुपारी अटक केल्यानंतर सुरुवातीला तीन दिवस व नंतर एक दिवस अशी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा कडक पोलीस बंदोबस्तात दुपारी एक वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांनी विनोद शिवकुमारला कडक पोलीस बंदोबस्तात धारणी न्यायालयात हजर केले. प्रथमश्रेणी न्यायाधीश एम.एस. गाडे यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. विनोद शिवकुमारबद्दल समाजमनात प्रचंड संताप असल्याने मंगळवारी त्याला कुणी घेराव टाकू नये, काही अनुचित घटना घडू नये, याकरिता ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी सोमवारी रात्रीच जिल्हास्तराहून दंगा नियंत्रण पथक बोलावून घेतले.
बॉक्स
एसीबीकडून ऑडियो क्लिपची पडताळणी
मृतक दीपाली चव्हाण यांच्या मोबाईलमध्ये मृत व आरोपीच्या संभाषणाची ऑडियो क्लिप सापडली आहे. त्यात आरोपी विनोद शिवकुमार हा मृत दीपाली चव्हाण यांना एकेरी भाषेत व अपमानित करून बोलल्याचे दिसून आले. ते संभाषण खरोखर आरोपी व मृत यांचेच काय, हे तपासण्याकरिता अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला धारणीत पाचारण करण्यात आले. आरोपी शिवकुमार याचे बोलणे पुन्हा ध्वनिमुद्रित करून ते तपासण्याकरिता पाठविण्यात आले.
एसडीपीओ पूनम पाटील यांनी मांडली बाजू
प्रकरणाच्या विशेष महिला चौकशी अधिकारी तथा एसडीपीओ पूनम पाटील व सरकारी वकील राज सिद्दीकी यांनी मंगळवारी न्यायालयात युक्तिवाद केला. जप्त मोबाईलमधील सीडीआर मागविला आहे. त्याची तपासणी करून आणखी काही पुरावे जमा करायचे आहेत. सुसाईड नोटमधील मुद्दे व घटनेचा कालावधी हा एक वर्षापेक्षा जास्त आहे. आरोपी मृताला मानसिक त्रास व अपमानित करीत असल्याचे नमूद आहे. या वेगवेगळ्या घटनास्थळावर जाऊन तेथील उपस्थितांचे बयान घ्यावे लागणार आहे. इतर आरोपींच्या सहभागाची चौकशी बाकी आहे. जंगलात एकटे बोलावले होते, त्या ठिकाणची पाहणी करावयाची असल्याने आणखी सात दिवसांचा वाढीव पीसीआर देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
बचाव पक्षाचा असा राहिला युक्तिवाद
आरोपीकडून गुन्ह्याबाबत जवळपास सर्वच साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्याचा तपासही झाला आहे. त्यामुळे आरोपीची तपासकामी पोलिसांना गरज नाही. पीसीआर देऊ नये, असा युक्तिवाद आरोपीचे वकील सुशील मिश्रा यांनी केला.
बॉक्स
आरोपी विनोद शिवकुमारची कोरोना चाचणी
आरोपी विनोद शिवकुमार याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहाने साकारलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. १४ दिवसांनंतर त्याला मध्यवर्ती कारागृहात हलविले जाईल. तत्पूर्वी, त्याची धारणीतील कोविड केअर सेंटरवर कोरोना चाचणी करण्यात आली.
असा झाला तपास
मृत दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील त्यांच्या हस्ताक्षराची तपासणी करण्यात आली. घटनास्थळ तसेच आरोपीच्या कार्यालयातील व घरातील कागदपत्रे लॅपटॉप, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. फिर्यादी राजेश मोहिते व इतर काही कर्मचारी व नागरिकांचे तपासकामी बयाण नोंदविण्यात आले.
कोट
सदर गुन्ह्याबाबत योग्य तपास सुरू आहे. तपासात कोणतीही हयगय झालेली नाही आणि होणार नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये. मंगळवारी न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
- पूनम पाटील, एसडीपीओ तथा तपास अधिकारी