विनोद शिवकुमारचा तात्पुरत्या कारागृहातच मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:44+5:302021-04-19T04:11:44+5:30
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा अद्यापही तात्पुरत्या कारागृहात ...
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा अद्यापही तात्पुरत्या कारागृहात मुक्काम कायम आहे. येथे मुक्कामाचा कालावधी संपला असताना अद्यापही शिवकुमार याला मध्यवर्ती कारागृहात का पाठविले नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, शिवकुमार याला ३० मार्च रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्याची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीजनांना किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवावे लागते. त्यानुसार विनोद शिवकुमार याला येथील अंध विद्यालयात क्वारंटाईन केले आहे. तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करून मध्यवर्ती कारागृहात पाठविणे अनिवार्य आहे. मात्र, विनोद शिवकुमार याला तात्पुरत्या कारागृहात १८ दिवस झाले असतानाही जुन्या कारागृहात म्हणजे मध्यवर्ती कारागृहात रवानगी केलेली नाही. दुसरी कोविड चाचणी झाली आणि ती सुद्धा निगेटिव्ह आली. तरीही शिवकुमार याला मोकळीक कशासाठी दिली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यवर्ती कारागृहात शिवकुमार याच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर नाही. कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट, नक्षलवादी, प्रसिद्ध खुनातील आरोपी जेरबंद आहेत, हे विशेष.
------------------
कोट
कारागृहात येणाऱ्या प्रत्येक आरोपीला समान वागणूक दिली जाते. तो कुणीही असो. त्याचप्रमाणे विनोद शिवकुमार यालादेखील तशीच वागणूक दिली जात आहे. तात्पुरत्या कारागृहात त्याचा कार्यकाळ संपला असला तरी पोलीस बंदोबस्त, सुट्यांमुळे जुने कारागृहात आणता आले नाही. सध्या शिवकुमार क्वारंटाईन आहे.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह