पोलिसांनी गनिमी काव्याने नेले विनोद शिवकुमारला कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:12 AM2021-04-03T04:12:30+5:302021-04-03T04:12:30+5:30
परतवाडा (अमरावती) : गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला मंगळवारी धारणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. लोकांपासून ...
परतवाडा (अमरावती) : गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला मंगळवारी धारणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. लोकांपासून वाचवत अमरावती कारागृहात नेण्यासाठी पोलिसांनी गनिमी काव्याचा अवलंब करीत त्याला पाच तालुके फिरवले. त्यानंतर कोठडीत डांबण्यात आले. शुक्रवारी ही माहिती उघड झाली.
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वे स्थानकाहून दक्षिणेकडे पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. धारणी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची व पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ही पोलीस कोठडी मंगळवारी संपल्यानंतर धारणी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात संपूर्ण राज्यभर विविध संघटना व नागरिकांनी निषेध नोंदविला. लोकसंतापाच्या उद्रेकाची शक्यता पाहता, आरोपीच्या सुरक्षिततेची जबाबदारी वजा दडपण पोलिसांवर आले होते.
बॉक्स
पोलिसांना लागली होती चाहूल
विनोद शिवकुमार धारणी, हरिसाल सेमाडोह, परतवाडा या मार्गाने अमरावती कारागृहात नेल्यास दगडफेक तसेच जनआक्रोशाचा सामना करावा लागेल, अशी खुपिया माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी त्याला प्रचंड बंदोबस्तात धारणी, ढाकना, खोंगडा (ता. चिखलदरा), परसापूर, पथ्रोट, (ता. अचलपूर), अंजनगाव सुर्जी, दर्यापूर मार्गे अमरावती असा पाच तालुक्यांतून प्रवास घडविला.