विनोद शिवकुमारच्या जामिनावर शनिवारी युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:18+5:302021-06-18T04:10:18+5:30
-------------------------------------------------------------------------------------------------------------- दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण राजेश मोहितेंकडून न्यायालयात वकिलामार्फत बाजू मांडण्यासाठी अर्ज परतवाडा : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण ...
--------------------------------------------------------------------------------------------------------------
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
राजेश मोहितेंकडून न्यायालयात वकिलामार्फत बाजू मांडण्यासाठी अर्ज
परतवाडा : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामिनावर गुरुवारी अचलपूर न्यायालयात होणारा युक्तिवाद आता १९ जून रोजा होणार आहे. दीपालीचे पती राजेश मोहिते यांच्यावतीने न्यायालयात अर्ज करून दोन दिवसांचा अवधी मागण्यात आला. तो न्यायालयाने मान्य केला आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अचलपूर न्यायालयात बुधवारी से दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी वेळ मागितल्याने गुरुवारी पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एस.के. मुंगीनवार यांच्या न्यायालयात युक्तिवाद व सुनावणी होणार होती. परंतु, प्रकरणातील फिर्यादी तथा दीपाली चव्हाण यांची पती राजेश मोहिते यांनी गुरुवारी अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल केला. सरकारी पक्षासोबत आपले वकील दीपक खुशलानी बाजू मांडणार असल्याचे अर्जात त्यांनी नमूद केले. दोन दिवसांचा अवधी देण्याची मागणी केली. न्यायालयाने मोहिते यांचा अर्ज ग्राह्य धरून १९ जून रोजी आरोपी विनोद शिवकुमार याच्या जामिनावर युक्तिवाद ठेवला आहे. सरकारच्यावतीने अभियोक्ता धनराज नवले, गोविंद विचोरे व फिर्यादीचे खासगी अभियोक्ता दीपक खुशलानी हे विनोद शिवकुमारच्या जामिनाला विरोध करणारी बाजू मांडणार आहेत.
बॉक्स
रेड्डी जामीन प्रकरणाची पुनरावृत्ती नको
अचलपूर न्यायालयात आतापर्यंत सरकारी अभियोक्तांनी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी विनोद शिवकुमार व सहआरोपी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या अंतरिम जामिनावर यशस्वी युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही आरोपींचा अंतरिम जामीन फेटाळला होता. परंतु, नागपूर येथे श्रीनिवास रेड्डी यांच्या जामीन प्रकरणात सरकारी पक्षाची अत्यंत कमकुवत बाजू सरकारी अभियोक्तांद्वारा मांडण्यात आली होती. ते पाहता, सरकारी पक्षाला सहकार्य म्हणून फिर्यादी राजेश मोहिते यांनी खासगी वकील दिल्याची चर्चा न्यायालय परिसरात होती.
बॉक्स
अडीच महिन्यांपासून कारागृहात
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी विनोद शिवकुमार ३० मार्चपासून अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. या दरम्यान त्याच्या वकिलांनी अचलपूर व नागपूर येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अचलपूर न्यायालयाने पूर्वी फेटाळला, तर नागपूर न्यायालयाने अचलपूर न्यायालयात चार्जशीट दाखल झाल्यामुळे तेथेच जामिनासाठी अर्ज करण्याचे सुचविले. आता शनिवारी जामिनावर युक्तिवादानंतर सुनावणी होणार आहे