विनोद शिवकुमारचे निलंबन, रेड्डी यांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:05+5:302021-03-27T04:14:05+5:30
राज्याचे प्रधान मुख्य वनंसरक्षक (वनबल) यांची माहिती, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल येथील वनपरिक्षेत्र ...
राज्याचे प्रधान मुख्य वनंसरक्षक (वनबल) यांची माहिती, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (३२) यांनी गुरुवारी सायंकाळी गोळी झाडून आत्महत्या केल्याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांचे निलंबन झाले, तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांची नागपूर येथे उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनंसरक्षक (वनबल) पी.साईप्रसाद यांनी शुक्रवारी येथे दिली.
प्रसार माध्यमांनी बोलताना पीसीसीएफ पी.साईप्रसाद म्हणाले, आरएफओ दीपाली चव्हाण यांची आत्महत्येची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरेने अमरावती गाठले. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वनपरिक्षेत्राधिकारी संघटना आणि दीपाली चव्हाण यांच्या नातेवाईकांनी पी.साईप्रसाद, नितीन काकोडकर यांनी भेट घेतली. तिच्या आत्महत्येला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारसह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी तितकेच जबाबदार असल्याची कैफियत मांडली. यावेळी वनविभागाचे प्रमुख या नात्याने पीसीसीएफ पी.साईप्रसाद यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या ही वनविभागासाठी फार दुर्देवी घटना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानाचे सुसाईड नोट लिहून ठेवले आहे. या सुसाईड नोटच्या आधारे ही कारवाई केल्याचे पी. साईप्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या घटनेबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला कळविले आहे. राज्याच्या प्रधान मुख्य सचिवांशी बोलणे झाले असून, दोषीवर कठोर कारवाई केली जाईल. वनविभागात अशाप्रकारच्या घटना घडणार नाही, याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही पी. साईप्रसाद यांनी दिली. यावेळी उपवनसंरक्षक पियूषा जगताप, चंद्रशेखरन बाला आदी उपस्थित होते. रेड्डी यांना नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात पुढील आदेशापर्यंत हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहे.
--------------------
वनविभागात विशाखा समितीचा आढावा घेणार
वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर वनविभागात महिला अधिकारी असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. त्याअनुषंगाने उपवनसंरक्षक, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक या स्तरावर दरमहा विशाखा समितीचा आढावा घेण्यात येईल, असे राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सांगितले.
-------
दीपाली चव्हाण यांनी लिहिली तीन स्वतंत्र पत्रे
आरएफओ दीपाली चव्हान यांनी आत्महत्येपूर्वी तीन स्वतंत्र चिठ्ठ्या लिहिल्या. त्यातील एक एम.एस. रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचे नाव आहे. अन्य दोन चिठ्ठ्या त्यांनी आई व पतीच्या नावे स्वतंत्रपणे लिहिल्या. त्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दोघांना पाठविल्या. त्या तिन्ही चिठ्ठ्या धारणी पोलिसांनी जप्त केल्या. त्यातील रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीनुसारच आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अन्य दोन चिठ्ठ्यांमधील मजकुर पूर्णपणे वैयक्तिक, कौटुंबिक व भावनिक स्वरूपाचा असल्याने ते जाहीर करणे कायद्याला व नैतिकतेला धरून नसल्याची प्रतिक्रिया धारणीचे ठाणेदार विलास कुळकर्णी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
--------------
मोबाईल जप्त, सीडीआर मागविला जाईल
मृत आरएफओ दीपाली चव्हाण यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. सुसाईड नोटमध्ये नमूद रेकार्डिंग, आरोपी विनोद शिवकुमार याचेसह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांशी झालेला संवाद व अन्य बाबींची खातरजमा त्यातून करण्यात येणार आहे. मोबाईलचा सीडीआर, हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेणे, हा चौकशीचा एक भाग असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. चौकशीसाठी आवश्यक असलेल्यांचे बयाणदेखील नोंदविण्यात येणार आहेत.
----------------
खासदार म्हणतात.. मी रेड्डींशी अनेकदा बोलले
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी सदर प्रकार आपल्याला सांगितला. विनोद शिवकुमार यांच्याशी झालेल्या बोलल्याचे रेकाडिंगदेखील मी ऐकली आहेत. त्यावर एम. एस. रेड्डी यांना दोन-तीनदा फोन लावले. चव्हाण यांची बदली करून द्या, अशी मागणीदेखील केली. मात्र, रेड्डी यांनी विनोद शिवकुमार यांचीच बाजू घेतल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिली. आमदार रवि राणा हेदेखील रेड्डी यांच्यासह तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचेशी बोलल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
--------------
चार महिने आरएफओको जेलमे रखो !
मार्च २०२० मध्ये मांगिया येथील अतिक्रमण आताच्या आता हटवा, असे निर्देश विनोद शिवकुमार यांनी दिले. तेथे गेली असता आपल्यासह पथकाला तेथील स्थानिकांनी कोंडले. ते वायरलेसवर त्यांना कळविले असता, ‘तुम झुठ बोल रहे हो, असे म्हणाले. गावकरी अॅट्राॅसिटी दाखल करणार आहेत, असे कळविले असता, ‘मै खुद एसपीको बोलके तुम्हारे उपर अॅट्राॅसिटी लगाता हूँ, चार महिने जेलमे आरएफओ को रखो, तो कैसा लगता है वो देखता हू’ असे ते म्हणाले. ती रेकाॅर्डिंग आपण खासदार नवनीत राणा यांना ऐकविल्याचे दीपाली चव्हाण यांनी रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
-----------------------