विनोद तावडे म्हणाले, आवाज चढवून बोलू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:30 PM2019-01-04T22:30:11+5:302019-01-04T22:30:35+5:30

राज्याचे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शुक्रवारी बोलावलेल्या ‘शैक्षणिक संस्थाचालकांशी संवाद सभे’त सिनेट सदस्य तथा प्राचार्य संतोष ठाकरे यांचे काही ऐकून न घेता, ‘आवाज चढवून बोलू नका, ऐकायचे नसेल तर बाहेर जा,’ अशी तंबी देत त्यांना खाली बसण्याचा सल्ला दिला.

Vinod Tawde said, do not speak out loud! | विनोद तावडे म्हणाले, आवाज चढवून बोलू नका!

विनोद तावडे म्हणाले, आवाज चढवून बोलू नका!

Next
ठळक मुद्देविद्यापीठात संवाद सभेत विसंवाद : शैक्षणिक संस्थाचालकांसोबत झडला वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याचे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शुक्रवारी बोलावलेल्या ‘शैक्षणिक संस्थाचालकांशी संवाद सभे’त सिनेट सदस्य तथा प्राचार्य संतोष ठाकरे यांचे काही ऐकून न घेता, ‘आवाज चढवून बोलू नका, ऐकायचे नसेल तर बाहेर जा,’ अशी तंबी देत त्यांना खाली बसण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर शिक्षणमंत्र्यांच्या स्वीय सहायकाने प्राचार्य ठाकरे यांचा हात धरून खाली बसविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही वेळातच संवाद सभा गुंडाळण्याची नामुष्की शिक्षणमंत्र्यांवर आली.
विद्यापीठाच्या स्व. के.जी. देशमुख सभागृहात आयोजित संवाद सभा पाऊणतास उशिराने सुरु झाली. कुलसचिव अजय देशमुख यांनी प्रास्ताविक, तर अध्यक्षीय भाषण कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले. त्यानंतर ना. तावडे यांनी संवादाला प्रारंभ केला. सुरुवातीला वसंतराव घुईखेडकर, हर्षवर्धन देशमुख, दीपक धोटे, श्रीकृष्ण अमरावतीकर, कांचनमाला गावंडे आणि त्यानंतर प्राचार्य संतोष ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी निगडीत मुद्दे शिक्षणमंत्र्यांच्या पुढ्यात ठेवले. डिजिटायझेशन झाले असताना विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही. महाविद्यालये कशी चालवावीत, विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या कोण, कशा सोडविणार, असा सवाल संतोष ठाकरे यांनी उपस्थित केला. मात्र, ना. तावडे यांनी ठाकरे यांनाच ‘आवाज चढवून बोलू नका, प्रश्न संपले असतील तर खाली बसा’ असे म्हटले. यादरम्यान शिक्षणमंत्र्यांच्या स्वीय सहायकाने ठाकरे यांचा हात धरून खाली बसवायचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे आणि स्वीय सहायक यांच्यात ‘तू-तू, मै-मै’ झाली. अखेर शिक्षणमंत्र्याच्या या अफलातून प्रकारावर संतोष ठाकरे संतापले ‘ऐकून घ्यायचे नसेल तर बोलावले कशाला? संवाद सभेची नौटंकी, फार्स बंद करा,’ असे म्हणत ठाकरे सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर सभेत स्मशानशांतता पसरली. काही वेळाने ती गुंडाळली. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, व्यवस्थापन परिषदेचे दिनेश सूर्यवंशी, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, तंत्रशिक्षण सहसंचालक डी.व्ही. जाधव, कुलसचिव अजय देशमुख, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर आदी सभेत उपस्थित होते.
शिक्षणमंत्री प्रश्नांबाबत गंभीर नाहीत
शिष्यवृत्तीचा प्रश्न संपूर्ण राज्यात गाजत आहे. काही मुद्दे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढ्यात ठेवले. मात्र, ते काहीच ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हते. कोणत्याही प्रश्नाचे गंभीरपणे उत्तर देत नव्हते. त्यामुळे संवाद सभा ही नौटंकी, फार्स ठरली, असे मूर्तिजापूर येथील प्राचार्य संतोष ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पैसे नसल्याची शिक्षणमंत्र्यांची कबुली
शैक्षणिक संस्थाचालकांचे प्रश्न, समस्या अनेक आहेत. मात्र, रिक्त जागा भरण्यासाठी तिजोरीत पैसे नसल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहिती कांचनमाला गावंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कर्मचारी भरतीशिवाय ‘नॅक’ दर्जा कसा मिळणार, असा प्रश्न गावंडे यांनी उपस्थित केला.

वाद नव्हे, ती संवाद चर्चा होती. काही विषयांवंर मत वेगळे मांडले जाऊ शकतात. संतोष ठाकरे यांनी काही प्रश्न, समस्या मांडल्यात. त्यांचे समाधान झाले नसावे. याला वाद म्हणता येणार नाही.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

Web Title: Vinod Tawde said, do not speak out loud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.