संचारबंदीचे उल्लंघन, शहरातील पाच दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:49+5:302021-04-17T04:12:49+5:30
अमरावती : राज्य शासनाने १५ एप्रिलपासून मिनीलॉकडाऊन जाहीर केले आहे. संचारबंदीचे तंतोतंत पालन होणे अपेक्षित आहे. मात्र, काही व्यावसायिक, ...
अमरावती : राज्य शासनाने १५ एप्रिलपासून मिनीलॉकडाऊन जाहीर केले आहे. संचारबंदीचे तंतोतंत पालन होणे अपेक्षित आहे. मात्र, काही व्यावसायिक, दुकानदार नियमांना छेद देत व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी शहरातील पाच दुकाने सील करण्याची कारवाई केली. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पुढील आदेशापर्यंत ही दुकाने सील राहतील, अशी माहिती आहे.
स्थानिक गांधी चौक मार्गावरील विमल डिजिटल लॅब, अंबादेवी मार्गावरील बालाजी कापड मॅन्युफॅक्चरिंग व राजकमल चौकातील दूग्धपूर्णा, इर्विन चौक स्थित बु-हाणपूर जिलेबी विक्री व ज्युस सेंटर या प्रतिष्ठांनाचा समावेश आहे. महापालिका फिरत्या पथकाला संचारबंदीत या तिन्ही प्रतिष्ठानाचे संचालक व्यवसाय करताना दिसून आले. शासनाने संचारबंदी जाहीर करताना कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी काय सुरू असेल काय बंद असेल, ही नियमावली स्पष्ट केली आहे. त्यामुळे सील करण्यात आलेली हे तिन्ही दुकानांत संचारबंदीचे उल्लंघन झाल्याचा ठपका महापालिका प्रशासनाने केला आहे. दरम्यान दूग्धपूर्णा या प्रतिष्ठांनासमोर नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे करण्यात आली होती, हे विशेष. आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पुढील आदेशापर्यंत ही दुकाने सील राहणार आहे. ही कारवाई सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे व पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली बाजार परवाना विभागाचे निरीक्षक आनंद काशीकर, अभियंता संकेत वाघ, शुभम चोमडे, सागर कठोर, मनोज इटनकर यांनी केली.