जिल्हा पोलीस अधीक्षकांविरूद्ध पुन्हा आमदारांचे हक्कभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:28+5:302021-07-02T04:10:28+5:30
सुलभा खोडके यांना कार्यक्रमातून डावलल्याचा आरोप, पावसाळी अधिवेशनात एसपीविरुद्ध आणणार हक्कभंग प्रस्ताव अमरावती : जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने ...
सुलभा खोडके यांना कार्यक्रमातून डावलल्याचा आरोप, पावसाळी अधिवेशनात एसपीविरुद्ध आणणार हक्कभंग प्रस्ताव
अमरावती : जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने २० जून रोजी अमरावती विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमातून आमदार सुलभा खोडके यांना डावलण्यात आले. अशाप्रकारे स्थानिक लोकप्रतिनिधींचा जाणीवपूर्वक अवमान केल्यामुळे आ. खोडके या आगामी पावसाळी अधिवेशनात जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हरिबालाजी एन. यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार आहे. या संदर्भातील तक्रार वजा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे पाठविल्याचे त्या म्हणाल्या. यापूर्वी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी एसपीविरूद्ध हक्कभंग प्रस्ताव सादर केला, हे विशेष.
अमरावती विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोलीस क्रीडांगण, आशियाना क्लब, मंथन सभागृह नूतनीकरण, रक्षादीप अभियान तसेच पोलीस हेल्थ ॲप अशा विविध कार्यक्रमांचे उद्घाटन २० जून २०२१ रोजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व शासकीय कार्यक्रमाला अमरावतीचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी केले होते. मात्र, आ. सुलभा खोडके यांना आमंत्रण देण्यात आले नाही, असे हक्कभंग प्रस्तावातून म्हटले आहे. हा एक शासकीय कार्यक्रम असताना आ. खोडके यांना आमंत्रण कळविण्यात आले नाही व त्यांच्या नावाचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेमध्ये करण्यात आला नाही. तसेच कोणशिलेवरही त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. आ. सुलभा खोडके या अमरावती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असून या शासकीय कार्यक्रमाला त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे स्पष्ट होते.
---------------
हक्कभंग प्रस्ताव स्वीकृत
पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्याविरुद्ध महाराष्ट विधानसभा नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाची सूचना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हा प्रस्ताव स्वीकृत करून विशेष हक्कभंग समितीकडे पुढील कारवाईकडे पाठविण्यात यावा, अशी सूचनादेखील आ. सुलभा खोडके यांनी पत्रातून केली आहे.