अवैध सावकाराच्या दुकान निवासस्थानी धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:55+5:30
महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ चे तरतुदीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शेकडो कोरे आणि रकमा लिहिलेले धनादेश, कोट्यवधींचा व्यवहार असलेले १२७ गहाणखत, खरेदीखत, स्थावर मालमत्ता तसेच शेती व प्लॉटचे दस्तऐवज पंचनामा करून जप्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात अवैध सावकारीचा व्यवसाय करणारे अभय नगीनदास बुच्चा याचे रॉयलीप्लॉट स्थित प्रतिष्ठान व श्रीकृष्णपेठ येथील निवासस्थानी सहकार विभागाच्या दोन पथकांनी बुधवारी धाडसत्र राबवून शेकडो धनादेश आणि कोट्यवधींच्या व्यवहाराचे दस्तऐेवज जप्त केले. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर शहर कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, असे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी स्पष्ट केले.
मोर्शी येथील सहायक निबंधक कार्यालयात २७ जून रोजी शेतकरी असलेल्या एका महिलेने अभय बुच्चा याच्या विरोधात अवैध सावकारीची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने सहकार विभागाने पडताळणी केली असता, तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव व सहकार अधिकारी श्रेणी-२ सुधीर मानकर व सहायक निबंधक सहदेव केदार यांनी संबंधित अवैध सावकाराचे प्रतिष्ठान व निवासस्थानी झाडाझडती घेण्यासाठी दोन पथके तयार केली होती.
महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ चे तरतुदीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शेकडो कोरे आणि रकमा लिहिलेले धनादेश, कोट्यवधींचा व्यवहार असलेले १२७ गहाणखत, खरेदीखत, स्थावर मालमत्ता तसेच शेती व प्लॉटचे दस्तऐवज पंचनामा करून जप्त करण्यात आले. जप्त दस्तऐवजांची पडताळणी केली जाणार आहे. यात सत्यता अथवा नियमबाह्य प्रकार आढळल्यास महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ च्या तरतुदीनुसार शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी सहकार विभागाने चालविली आहे.
कारवाईत पहिल्या पथकात चांदूर बाजारचे सहायक निबंधक आर.व्ही. भुयार यांच्यासह आर. ओ. विटनकर, अविनाश महल्ले, नंदकिशोर दहीकर होते. दुसऱ्या पथकात मोर्शीचे सहायक निबंधक सहदेव केदार यांच्यासह सचिन कुळमेथे, राजेंद्र ठाकरे, दीपाली भिसे यांचा सहभाग होता. शहर कोतवाली ठाण्यातील पोलीस शिपाई कारवाईत सहभागी होते. डीडीआर कार्यालयाद्वारा अवैध सावकारीविरोधात सहा महिन्यांतील हे दुसरे धाडसत्र आहे. बुच्चा यांचे दुकान व निवासस्थानातील धाडसत्राची माहिती होताच गुरूवारी शहरातएकच खळबळ उडाली.
शहरात अवैध सावकारांचा सुळसुळाट
अलीकडे शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारांचा सुळसुळाट झालेला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सहा महिन्यांपूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारा सहा पथकांनी सहा अवैध खासगी सावकारांविरुद्ध धाडसत्र राबविले. यावेळी कोट्यवधींच्या व्यवहारांचे दस्तऐवज आढळले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. अवैध सावकारांविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
जप्त दस्तऐवज
अभय बुच्चा याचे रॉयली प्लॉट येथील दुकानामध्ये १२ कोरे धनादेश, रक्कम अंकित असलेले काही धनादेश, शेती व प्लॉटसंदर्भातील खरेदी खत व अन्य असे ८५ दस्तऐवज जप्त करण्यात आले.
बुच्चा याचे श्रीकृष्णपेठ येथील निवासस्थानी स्थावर मालमत्तेच्या कागदपत्रांसह कोरे व रक्कम लिहिलेले काही धनादेश तसेच खरेदीखत, शेती व प्लॉटसंदर्भातील ४२ दस्तऐवज जप्त करण्यात आलेत.