परतवाड्यातील ‘व्हीआयपी’ रस्ता गेला चोरीला
By admin | Published: March 7, 2016 12:03 AM2016-03-07T00:03:27+5:302016-03-07T00:03:27+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे जाणारा ‘व्ही.आय.पी’ रस्ता अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीच्या जाळ्यात चोरीला गेल्याने वाढती वाहतूक पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
अवैध वाहतूक, वाढते अतिक्रमण : पालिका, वाहतूक विभाग झाले आंधळे बहिरे !
नरेंद्र जावरे परतवाडा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे जाणारा ‘व्ही.आय.पी’ रस्ता अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीच्या जाळ्यात चोरीला गेल्याने वाढती वाहतूक पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
धारणी मार्गावरील टपाल कार्यालयामागून सा.बां. विभागाच्या विश्रामगृहाकडे रस्ता जातो. या रस्त्यावर होलीक्रॉस मराठी शाळा असून संतोषनगर, गोपालनगर, गौलखेडा कुंभी, मल्हारा, नरसरी हे परतवाडा शहराला लागून असलेली गावे आहेत. दुसरीकडे विश्रामगृहावर सतत जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांचे मुक्काम राहते, व्हीआयपी रस्ता म्हणून त्यांची ओळख आहे. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. पादचाऱ्यासह दुचाकी चालकांना वाढते अतिक्रमण व अवैध वाहतुकीचा थांबा पाहता जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागत आहे.
कोण करणार कारवाई ?
चिखलदरा थांबा नावाने या चौकाची ओळख असून तेथूनच धारणी वजा विश्रामगृहाकडे जाणारा व्हीआयपी रस्ता आहे. अरुंद असलेल्या या रस्त्यावर हॉलीक्रॉस शाळेपर्यंत हातठेले, पानटपऱ्या, कॅन्टीन, हॉटेलचे अतिक्रमण व त्यामुळे मेळघाटसह परिसरात चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहने दिवसभर रस्त्याच्या दुर्तफा उभ्या राहत आहेत.
अगदी चौकात पालिकेने अॅटो थांबा दिल्याने अतिक्रमण व अवैध वाहतूक करणारे वाहने रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा करताना दिसून येत आहे. दिवसभर हे चित्र वाहतूक विभाग व पालिका प्रशासनाला दिसत असताना त्यांनी आंधळे व बहिरे झाल्याचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे.
धारणीकडे जडवाहतूक करणारे ट्रक व य-जा करणारी जड वाहने दिसल्यावरसुध्दा आॅटोचालकांची मुजोरी प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणारी ठरली आहे.
रस्ता सुरक्षा सप्ताह संपला
वाहतुकीचा परतवाडा शहरात चांदूरबाजार नाका, अचलपूर नाका, फिन्ले मिल स्टॉप, बाजार समिती, बसस्थानक, जयस्तंभ चौक, जगदंबा चौक, चिखलदरा, अंजनगाव, बैतूल स्टॉप येथे पहावयास मिळतो. पादचाऱ्यांसह दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन येथून चालावे लागते. याच वाहतूक विभागाने गत महिन्यांत झालेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात संपूर्ण शहराला नियम शिकविले होते. मात्र सप्ताह संपताच नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे गंभीर चित्र आहे.
कुठे गेले अतिक्रमण निर्मूलन पथक ?
अचलपूर नगरपालिकेत दिवाळीचे फटाके आणि गोडधोड फराळ झाल्यावर दोन अभियंत्यांची नियुक्ती करीत अतिक्रमण निर्मूलन पथक तयार केले होते. व्हीआयपी रस्त्याप्रमाणे शहरातील इतरही वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण वाढले. परिणामी ते अपघाताला कारणीभूत ठरणारे आहे. त्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारा ठरणार आहे. विश्राम गृहाकडे जाणाऱ्या गाड्यांचा ताफासुध्दा या वाढलेल्या अतिक्रमण व बेशिस्त वाहतुकीला कारणीभूत ठरतेय.