जिल्हा परिषदेच्या १५ कोविड सेंटरला ३० नेब्युलायझर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:03+5:302021-05-18T04:14:03+5:30
नुटा प्राध्यापक संघटनेचा पुढाकार, ग्रामीण भागात कोरोना रुग्णांसाठी सुविधा अमरावती : जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये कोविडचे रुग्ण वाढत ...
नुटा प्राध्यापक संघटनेचा पुढाकार, ग्रामीण भागात कोरोना रुग्णांसाठी सुविधा
अमरावती : जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये कोविडचे रुग्ण वाढत असून, तालुका, ग्रामीण आरोग्य केंद्राची गरज लक्षात घेता, नुटा संघटनेने १५ केंद्रांकरिता प्रत्येकी दाेन याप्रमाणे ३० नेब्युलायझर मशीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांना भेट देण्यात आले.
नुटा संघटनेच्या माध्यमातून प्राप्त नेब्युलायझर मशीन ग्रामीण व दुर्गम भागातील कोविड रुग्णांसाठी व लहान मुलांसाठी उपयुक्त ठरतील, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी व्यक्त केले.
महामारीच्या काळामध्ये डॉक्टर, परिचारिका मानवतेच्या दृष्टीने उच्च कोटींचे कार्य करीत आहेत. या कार्याला बळ देण्यासाठी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडणे प्रत्येक समाजघटकाचे काम आहे. महामारीच्या काळात नुटातर्फे गरजू लोकांना अन्नधान्य वाटप, लसीकरण शिबिराचे आयोजन तसेच जिल्हा कोविड रुग्णालयांना मदत यांसारखे कार्य करण्यात आले.
नुटाचे अध्यक्ष प्रवीण रघुवंशी यांनी संघटना सतत या कार्यामध्ये सहभागी राहील व मदत करेल, असे सांगितले. वरिष्ठ आरोग्य अधिकारी दिलीप चऱ्हाटे, नुटाचे महेंद्र मेटे, नितीन चांगोले, दिलीप हांडे, विलास ठाकरे, डॉ. सुभाष गावंडे याप्रसंगी उपस्थित होते.